दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
"मुलांना फक्त पैसा, मालमत्ता किंवा सुखसोयी देण्यापेक्षा त्यांना शिक्षण, संस्कार, प्रामाणिकपणा आणि कष्टाची सवय द्या. कारण संपत्ती नष्ट होऊ शकते, पण योग्य घडवलेली संतती आयुष्यभर स्वतःही उभी राहते आणि समाजालाही उभं करते." असा प्रेरक सल्ला कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी दिला. ते हरसूल येथ आयोजित समाज प्रबोधनपर कीर्तनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तहसीलदार मयुर राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार, माजी सभापती मिलिंद मानकर, रामदास आठवले सूतगिरणीचे अध्यक्ष महेंद्र मानकर, उज्वला मानकर, उमेश अलोने, आमीन चौहान, पोलिस पाटील रामकृष्ण इंगोले मंचावर उपस्थित होते.
कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या “सत्यपाल ची सत्यवाणी” या समाजप्रबोधनात्मक कीर्तनाने हरसूल येथील ग्रामस्थांच्या मनावर खोल ठसा उमटवला. भीमजयंती ते ग्रामजयंती या थोर महामानवांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात भक्ती, विचार आणि सामाजिक जाणीव यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. शहीद सैनिकांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे सलग तीन तास सत्यपाल महाराज यांनी आपल्या कृतीयुक्त कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आपल्या प्रभावी वाणीने आणि सडेतोड शैलीने त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, अविवेकी रुढी, परंपरा, वाईट चालीरीती, हुंडा, व्यसन यावर जोरदार प्रहार केले. “संततीसाठी संपत्ती निर्माण करू नका, तर संपत्ती निर्माण करणारी संतती तयार करा,” हा त्यांचा संदेश प्रत्येकाच्या मनात घर करून गेला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक शाहीर गजानन सोनुने यांनी केले, तर बळवंत ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश लोहटे, दिगंबर ठाकरे, संजय मस्के यांचेसह गुरुदेव सेवा मंडळ, बिरसा मुंडा उत्सव समिती, नवयुवक भीम टायगर सेना, संभाजी ब्रिगेड, वारकरी भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले. कीर्तनासाठी हरसूलसह परिसरातील रुई गोस्ता, पोहरादेवी, गादेगाव, धानोरा, गांधीनगर, लायगव्हाण, मांडवा, मोरखेड, साखरा व दिग्रस येथून लोक आले होते.
चौकट /बॉक्स
“माय, मावल्यांनो… महाराजांच्या दुरूनच पाया पडत जा!”
सध्या राज्यभर गाजत असलेल्या “खरात प्रकरणा”वर आपल्या विनोदी आणि खास टीकात्मक शैलीत भाष्य करताना त्यांनी समाजातील वास्तवावर परखड शब्दांत बोट ठेवले. श्रद्धा ठेवा, पण विवेक हरवू नका या भावनेतून “आजच्या काळात महिलांनी महाराजांच्या दुरूनच पाया लागावे,” असे सांगत त्यांनी सजगतेचा इशारा दिला. या कीर्तनातून सत्यपाल महाराज यांनी केवळ भक्तीचा संदेश दिला नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, नैतिक मूल्ये आणि सुसंस्कारित पिढी घडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रभावी वाणीमुळे उपस्थितांमध्ये आत्मपरीक्षणाची भावना जागृत झाली. कीर्तनाला उपस्थित अनेक महिलांना साड्या तर मुलांना पुस्तके भेट, बक्षीस दिले.
महाराजांचे कीर्तन एक नंबर. पूर्ण कीर्तन ऐकायचे असेल तर ... https://www.youtube.com/live/pFulJz8WAus?si=Z9yFBYBCR3GZP1Ao
ReplyDelete