मानोरा (जि. वाशिम),( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज) — तालुक्यातील तीर्थक्षेत्र आसोला येथील कोंडदरी धरणातून वाहणाऱ्या नाल्यावर जलसंधारण विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या बंधाऱ्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत तत्काळ चौकशी करून कामाची देयके थांबवावीत, अशी मागणी प्रमोद प्रल्हाद आडे (रा. शेंदुरजना, ता. मानोरा) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, सदर बंधारा शासकीय निधीतून मंजूर असून कंत्राटदारामार्फत काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र कामात दर्जाहीन साहित्याचा वापर करून निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इस्टिमेटला बगल देत कॉलममध्ये दगडाऐवजी मुरूम-माती टाकल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कामावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता कार्यालयातूनच देखरेख केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच, कामाच्या ठिकाणी आवश्यक माहितीफलक नसून शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित कंत्राटदाराच्या इतर कामांबाबतही तक्रारी असल्याचा उल्लेख करत दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कामाच्या विविध टप्प्यांचे जीपीएस फोटो व व्हिडिओ पुरावे निवेदनासोबत सादर केल्याचे आडे यांनी सांगितले. चौकशी पूर्ण होईपर्यंत बंधाऱ्याची देयके अदा करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment