मानोरा : ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
तालुक्यातील विठोली येथील पि.एम. जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत जि.प. शाळा विठोली व श्री गुरुदेव सेवा मंडळ मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ मे ते ३० मे २०२६ दरम्यान बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या २८ व्या दिवशी विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संस्कार, शिक्षण, आरोग्य व राष्ट्रसंतांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. किरणताई पद्मगिरवार म्हणाल्या की, “धन-दौलत, इस्टेटीपेक्षा संस्कार सर्वात मोठे आहेत.” आज अनेकांकडे संपत्ती भरपूर असली तरी योग्य संस्कारांची कमतरता जाणवते. राष्ट्रसंत व क्रांतीवीरांनी समाजकल्याणासाठी केलेले कार्य आजच्या पिढीसमोर आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना दिलेले सोन्याचे टोपले त्यांनी नाकारल्याचा दाखला देत, संतांच्या दृष्टीने संस्कार आणि अध्यात्म हेच खरे वैभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या काळात लहान बालके व विद्यार्थ्यांना राष्ट्रसंतांचे विचार आणि सुसंस्कारांची नितांत गरज असल्याचे सांगून, चांगले संस्कार असतील तरच व्यक्ती समाजात आदर्श निर्माण करू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ह.भ.प. बेबीताई जाधव यांनी व्यसनमुक्ती, योग्य आहार, निरोगी शरीर व शिक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच दि. २८ मे रोजी राजेश नेमाने (माजी सभापती), विरुजी यादव व गोपाल नाटकर यांनीही शिबिरार्थींना शिक्षण, आहार, प्राणायाम, व्यवहार व संस्कार या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास लोमेश चौधरी, सुदाम तायडे, उमेश ठाकरे, चंदूभाऊ राठोड, मुख्याध्यापक अरुण पाटील, भालदान सेवाधिकारी अर्जुन लोंढे, शिक्षक-शिक्षिका तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताराचंद चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद खुळे यांनी मानले. शिबिराचा २८ वा दिवस अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment