मानोरा :( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
शहर आणि तालुक्यातील प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या बसस्थानकावर विविध ठिकाणी जाण्यासाठी जमा होतात, तेथे असलेल्या चौकशी कक्षाला भर दुपारी कुलूप लावलेले आढळून येत असल्याने 'चौकशी करायची तरी कोणाकडे?' असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहिला आहे. गर्दीच्या हंगामातही जबाबदार कर्मचारी गैरहजर असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
मंगरुळनाथ आगाराअंतर्गत मानोरा बस स्थानकाचे संचालन केले जाते. या ठिकाणाहून मानोरा तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच अकोला, यवतमाळसह अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी महामंडळाकडून प्रवासी वाहतूक केली जाते. उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराईमुळे सध्या बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
प्रवाशांना बसच्या वेळा, मार्ग व इतर माहिती कळावी यासाठी मानोरा बस स्थानकावर चौकशी कक्षाची स्थापना केलेली आहे. येथे सहाय्यक वाहतूक निरीक्षक दर्जाचा कर्मचारी नियुक्त केलेला असतो. मात्र, दि. १० मे रोजी दुपारी वाजून ४१ मिनिटांनी घेतलेल्या छायाचित्रात चौकशी कक्षाला कुलूप दिसून येत आहे. तर बाहेर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आहे.
कोणती बस कुठे जाणार, किती वाजता सुटणार याची माहिती मिळत नसल्याने प्रवासी गोंधळात पडत आहेत.
भर उन्हात ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
एसटीची माहिती न मिळाल्याने नाईलाजाने प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
*कर्मचारी गैरहजर:*
नेमणुकीच्या ठिकाणी कर्मचारी गैरहजर राहत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चौकशी कक्ष शेवटची बस जाई पर्यंत सुरू ठेवावा व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
*प्रशासनाने दखल घ्यावी:*
गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी कक्ष सुरळीत सुरू करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा प्रवाशांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
*फोटो:* मानोरा बसस्थानकावर चौकशी कक्षाला कुलूप असताना बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झालेली गर्दी. (छाया: दि. 10/05/2026, दुपारी 2:41)
No comments:
Post a Comment