मानोरा,( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस ): राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानोरा येथील सामाजिक सभागृह धम्मभूमी येथे भटके विमुक्त समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत संविधानिक हक्क, शासकीय योजना, संघटन बांधणी व सामाजिक नेतृत्व विकास या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर रोशन चव्हाण यांनी भटके विमुक्त समाजासमोरील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटन मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक आप्पाराव राठोड व शरद बराते यांनी संविधानाने दिलेले अधिकार, शासनाच्या विविध योजना, त्यांची प्रभावी अंमलबजावणी तसेच समाजहितासाठी राबवावयाच्या कृती कार्यक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा. जय चव्हाण यांनी कार्यकर्ता कसा असावा, त्याचे नेतृत्वगुण, समाजाप्रती असलेली जबाबदारी व संघटनात्मक कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण जनविकास संस्थेचे पदाधिकारी संतोष जाधव यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाला समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाल राठोड व रीना ताई यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी रीना ताई यांनी उपस्थितांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment