कारखेडा, ता. मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) :
कारखेडा येथील सर्वे क्रमांक 30 मधील शेतातून गेलेली मुख्य वीजवाहिनी सध्या धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, तिचा आधार असलेला वीज खांब मोठ्या प्रमाणात झुकल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दुर्घटनेची शक्यता लक्षात घेता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
सदर शेताचे मालक कृष्णकुमार गजाननराव सोळंके असून, शेताची मशागत चंद्रकांत गजाननराव देशमुख करीत आहेत. शेतातील कामकाज सुरू असताना झुकलेल्या खांबामुळे मजूर, शेतकरी तसेच जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या मार्गाने महावितरणचे फिटर व लाईनमन नियमितपणे ये-जा करतात. त्यामुळे खांबाची धोकादायक स्थिती त्यांच्या निदर्शनास असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अनेकदा तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारे किंवा मुसळधार पावसामुळे हा खांब कोसळल्यास मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून झुकलेल्या खांबाची दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत. "अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वी प्रतिबंध करणे आवश्यक आहे," अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment