दिग्रस: (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा’ या संकल्पनेतून दिग्रस येथे ‘आरोग्य संकल्प अभियान’ अंतर्गत भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मा. आरोग्य सेवा समिती, यवतमाळ यांच्या वतीने तसेच दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर रविवारी, १४ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दिनबाई विद्यालय, दिग्रस येथे पार पडणार आहे.
या शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयविकार, कर्करोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, हृदयरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा विकार, श्वसनरोग, मानसिक आजार, न्यूरो विकार, दंत व मुखरोग तसेच मूत्ररोग आदी विविध आजारांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर (मेमोग्राफी) तपासणी, विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी, पॅप स्मिअर चाचणी, बंध्यत्व तपासणी, व्हेरिकोज वेन्स तपासणी, किडनी तपासणी तसेच ईसीजीसह विविध आरोग्य चाचण्या करण्यात येणार आहेत.
शिबिरामध्ये तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील उपचार, शस्त्रक्रिया व विशेष वैद्यकीय सेवांसाठी मार्गदर्शन केले जाणार असून अनेक उपचार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासोबतच नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड काढण्याची सुविधाही शिबिरात उपलब्ध राहणार आहे. यासाठी लाभार्थींनी आधार कार्ड, रेशन कार्ड व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिग्रस, दरव्हा आणि नेर विधानसभा मतदारसंघातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आरोग्य सुविधा सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment