Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, June 14, 2026

अडाण नदीत बुडून आतेभाऊ–मामेभाऊचा दुर्दैवी मृत्यू; इंझोरी गावावर शोककळा

मानोरा, दि. १४ जून :(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) 
पवित्र अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीत स्नान व पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी गोमुखेश्वर संस्थानजवळ घडली. या घटनेमुळे इंझोरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये शुभम अमोल धोंडे (वय १४, रा. इंझोरी) व दर्शन सुनील वावगे (वय २०, रा. भातकुली, जि. अमरावती) यांचा समावेश आहे. हे दोघे मामे–आतेभाऊ होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीत स्नान करण्यासाठी आणि पोहण्यासाठी शुभम व दर्शन हे गोमुखेश्वर संस्थानजवळील नदीपात्रात गेले होते. पोहत असताना नदीतील खोलगट गड्ड्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात ओढले गेले व बुडू लागले.
नदीकाठावर खेळत असलेल्या काही मुलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर नदीत मासेमारी करणारे स्थानिक कोळी बांधव व नागरिक घटनास्थळी धावले. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती गावात पसरताच नातेवाईक व ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. गावातील युवक विशाल वानखेडे यांनी स्वतःच्या वाहनातून दोघांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही बातमी समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.
कुटुंबाचा एकुलता एक दिवा विझला
मृत्यूमुखी पडलेला शुभम हा अमोल धोंडे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो गेल्या वर्षभरापासून आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टीसाठी तो काही दिवसांपूर्वीच गावी आला होता. सुट्टीसाठी घरी आलेल्या मुलाचा आणि नात्यातील तरुणाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने धोंडे व वावगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण इंझोरी गावासह मानोरा तालुक्यात शोककळा पसरली असून, दोन्ही युवकांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर