दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी आणि प्रशासकीय घडी बसवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा' यशस्वीरित्या पार पडली असून, त्याचा निकालही जाहीर झाला आहे. या यशस्वी प्रक्रियेमुळे आता राज्यभरातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये २४१० नवीन केंद्रप्रमुख लवकरच प्रत्यक्ष सेवेत रुजू होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे केंद्रप्रमुख भरतीची ही प्रक्रिया रखडलेली होती. केंद्रप्रमुख हे शाळा आणि प्रशासन यांमधील मुख्य दुवा म्हणून काम करतात. ही पदे रिक्त असल्याने अनेक शाळांच्या पर्यवेक्षणावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. मात्र, शासनाने सकारात्मक पाऊल उचलत परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण केली. याबद्दल सर्व स्तरांतून प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
या विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ३८ हजार शिक्षकांनी नोंदणी केली होती. प्राथमिक अंदाजानुसार, निवड प्रक्रियेनंतर आता प्रत्येक जिल्ह्यात गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. यात सर्वाधिक १५१ जागा पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी ३० जागा भंडारा जिल्ह्यात भरल्या जात आहेत.
राज्यातील सर्वाधिक पदे खालील ५ जिल्ह्यात भरली जात आहेत.
पुणे १५१
रत्नागिरी १२५
अहमदनगर १२३
नाशिक १२२
रायगड ११४
विदर्भात भरली जाणारी जिल्हानिहाय पदे:
यवतमाळ ८९
अमरावती ६९
नागपूर ६८
चंद्रपूर ६६
बुलढाणा ६५
गडचिरोली ५०
वर्धा ४३
अकोला ४२
गोंदिया ४२
वाशीम ३५
भंडारा ३०
राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमधील एकुण मंजूर पदांच्या अर्धी अर्थात २४१० रिक्त पदे भरली जात आहेत. ही पदे भरली जात असल्याने शिक्षकांची सुमारे अडीच हजार पदे रिक्त होणार आहेत. या रिक्त पदांचा समावेश पवित्र पोर्टलवर करुन राज्यातील अडीच हजार बेरोजगारांना शिक्षकाची नोकरी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सरकारी शाळेतील मुलांना नवीन केंद्रप्रमुखांसह नवीन शिक्षक सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहेत हे इथे उल्लेखनीय!
"राज्यातील शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणे आमचे प्राधान्य होते. ग्रामविकास आणि शिक्षण विभागाच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली आहे."
— शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य.
शाळांना मिळणार नवा गतीमान चेहरा
एक केंद्रप्रमुख साधारणपणे १३ ते १६ शाळांवर नियंत्रण आणि मार्गदर्शन ठेवतो. नवीन २४१० केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीमुळे शासकीय व जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन पद्धती, प्रशासकीय कामे, आणि शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणांची (NEP) अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रखडलेला पेच सोडवून ही परीक्षा वेळेत पूर्ण केल्याबद्दल राज्यभरातील शिक्षक संघटनांनीही मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि संपूर्ण प्रशासकीय टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment