मानोरा, : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत साखरडोह येथे दि. 4 जून 2026 रोजी जिल्हास्तरीय तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रमिला कोवे मॅडम तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मा. वासनिक सर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ग्रामपंचायतीच्या विविध कामांची सखोल पाहणी केली.
सकाळी 8 वाजता पथक ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाल्यानंतर ऑनलाइन डेटाची तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी एस. पी. गावंडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे सादरीकरण करत विविध नमुने, कागदपत्रे तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या उपक्रमांची माहिती पथकासमोर मांडली.
ग्रामपंचायतीच्या वतीने पीपीटी आणि स्लाईडद्वारे विविध विकासकामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पथकाने ग्रामपंचायतीच्या उल्लेखनीय कामांना प्रत्यक्ष स्थळभेटी देऊन पाहणी केली. यामध्ये मीयावाकी प्रकल्पांतर्गत वृक्षलागवड, ग्रामपंचायतीने विकसित केलेले स्वतःचे मोबाईल अॅप तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले क्रीडांगण या उपक्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतच्या केंद्र चालक रेखा मिलिंद पखाले यांनी ऑनलाइन कामकाजात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला कोवे मॅडम व त्यांच्या पथकाच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तपासणी पथकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी निरंजन अग्रवाल, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) प्रवीण खंदारे, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र टेंबरे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक विजय लोंढे, वैशाली खोब्रागडे, धर्मराज लांजे आदींचा समावेश होता.
पथक ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचताच संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच उज्वला गणेश भोयर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पंचायत समिती मानोरा येथील गटविकास अधिकारी विलास जाधव, पंचायत समिती रिसोडचे गटविकास अधिकारी गजानन खुडे, जिल्हा कक्षाचे बोडखे साहेब, कनिष्ठ अभियंता कैलास मगर, कनिष्ठ सहाय्यक रोशन पवार, पीटीओ गणेशकुमार राऊत, अंगणवाडी पर्यवेक्षक हेमा राऊत, बचत गटांच्या प्रभाग समन्वयक, गावस्तरीय कर्मचारी, बचत गटांच्या महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी सुरेश पाटील गावंडे यांनी केले. तपासणी यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment