दिग्रस: (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या दिग्रस शहर व तालुक्यातील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य कौतुक सोहळा शनिवार, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता दारव्हा रोडवरील बसस्थानकासमोरील राजेश्वर मंगल कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि दिग्रस मतदारसंघाचे आमदार ना. संजय राठोड यांच्या हस्ते हा प्रेरणादायी सत्कार सोहळा संपन्न होणार असून, विविध मान्यवरांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम गेल्या तब्बल १५ वर्षांपासून सातत्याने राबविला जात आहे.
प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही ना. संजय राठोड हे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना भेटवस्तू प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करणार आहेत. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या पालकांचाही यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी पालकांनी घेतलेले कष्ट, दिलेले मार्गदर्शन व केलेला त्याग यांचाही समाजासमोर गौरव व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दिग्रस शहर व तालुक्यातील विविध शाळांकडून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून, या सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसह उपस्थित राहून सत्काराचा मान स्वीकारावा, असे आवाहन शिवसेना, युवा सेना, विद्यार्थी सेना, युवती सेना तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, परिश्रम आणि यशाचा गौरव करणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, दिग्रस तालुक्यातील शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक व स्पर्धात्मक बनविण्यास या उपक्रमाची मोठी मदत होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment