शेंदुरजना आढाव/कारंजा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) – वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत 'फसल विमा महिना' उत्साहात सुरू करण्यात आला. १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मृग बहार हंगाम २०२६-२७ अंतर्गत संत्रा, लिंबू, पेरू व हळद या पिकांसाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत पूर्वी १४ जून २०२६ होती. मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही मुदत १४ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच डाळिंब पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ जुलै, तर सीताफळ पिकासाठी ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
हवामानातील अनिश्चितता व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कारंजा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी जैताडे, सोळंके व इतर कृषी अधिकारी, शेतकरी तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे विश्वनाथ काळे व भूषण शिकारे यांच्या उपस्थितीत 'फसल विमा महिना'चा शुभारंभ करण्यात आला. याच कार्यक्रमातून कारंजा तालुक्यात फळपीक विमा जनजागृती अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
No comments:
Post a Comment