Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, July 7, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा खरिप हंगाम २०२६-२७ साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


वाशिम, दि. ७ जुलै (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) : नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, कीड व रोगांमुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना – खरिप हंगाम २०२६-२७ मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.

शासनाच्या दि. ३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार वाशिम जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model (80:110) अंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत करण्यात येणार आहे.

योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना विमा संरक्षण उपलब्ध करून देणे, प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक स्थैर्य कायम राखणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन देणे तसेच कृषी क्षेत्रातील पतपुरवठा, उत्पादन आणि अन्नसुरक्षा बळकट करणे हा आहे.

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी AGRISTACK Farmer ID अनिवार्य असून, डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. प्रति अर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्र आवश्यक राहील. कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी वैयक्तिक मालकी, कुळाने किंवा नोंदणीकृत भाडेकरारावर शेती करणारे शेतकरी योजनेस पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकराराची प्रत पीक विमा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा रकमेच्या २ टक्के, तर नगदी पिकांसाठी ५ टक्के इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. सन २०२६-२७ साठी सर्व अधिसूचित पिकांचा जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. मृत शेतकऱ्यांच्या नावे किंवा फसवणुकीच्या उद्देशाने सादर केलेले प्रस्ताव रद्द करण्यात येतील. तसेच अशा प्रकरणांमध्ये संबंधित लाभार्थ्यांवर शासन नियमानुसार पुढील चार वर्षे काही कृषी योजनांपासून अपात्रतेची कारवाई करण्यात येऊ शकते.

योजनेअंतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाल्यास अधिसूचित महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोग अथवा तांत्रिक उत्पादनाच्या आधारे नुकसानभरपाई देण्यात येईल.

पिकनिहाय शेतकरी हिस्सा (प्रति हेक्टर)

- सोयाबीन – ₹१,२१८
- मूग – ₹५९.८५
- उडीद – ₹५९.८५
- तूर – ₹८७३.६०
- कापूस – ₹१,२१८

खरिप हंगाम २०२६ साठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. शेतकरी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल, बँक, सीएससी केंद्र किंवा विमा प्रतिनिधीमार्फत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी रक्षक हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी किंवा जवळच्या कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर