Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Thursday, July 16, 2026

राष्ट्रीय कर्तव्याची यशस्वी पूर्तता! विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या आठ बीएलओंचा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते गौरव.


शेंदुरजना (अ.) / वाशिम 
(दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस)

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव तसेच जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे उपस्थित होत्या.
या मोहिमेत वाशिम जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार पडताळणी, गणना प्रपत्रांचे वितरण आणि माहितीचे १०० टक्के डिजिटायझेशन अल्पावधीत पूर्ण करण्यात आले. उत्कृष्ट कार्याबद्दल वाशिम विधानसभा मतदारसंघातील दीपक राऊत व सिद्धार्थ भगत, कारंजा मतदारसंघातील दीपक वासनिक व सुदर्शन गुल्हाने तसेच रिसोड मतदारसंघातील संतोष शिंदे, शिवशंकर कवर, रेणुका काटकर आणि संदीप मुंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 – कर्तव्यनिष्ठेची प्रेरणादायी कहाणी.
गौरवप्राप्त बीएलओंनी आपल्या अनुभवांमधून मोहिमेतील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शालेय अध्यापनाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिले. सुरुवातीला काही ठिकाणी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असले तरी शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका, प्रत्यक्ष संवाद आणि सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यश आले.

ग्रामीण भागातील अनेक मतदार दिवसभर शेती व मजुरीसाठी बाहेर असल्यामुळे बीएलओंनी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार रात्री घराघरांत जाऊन गणना प्रपत्रांचे संकलन व माहितीचे संगणकीकरण पूर्ण केले. या समर्पित कार्यामुळेच १०० टक्के डिजिटायझेशनचे उद्दिष्ट यशस्वीरित्या गाठता आले.

👨‍🎓 विद्यार्थ्यांचाही मोलाचा सहभाग

या मोहिमेत विद्यार्थ्यांनीही जनजागृतीत महत्त्वाची भूमिका बजावली. मतदारांनी आधार कार्ड आणि रंगीत छायाचित्र तयार ठेवावे, यासाठी विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. गावागावांत दवंडी देऊनही जनजागृती करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रशासनाला उत्स्फूर्त सहकार्य केले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बीएलओंच्या समर्पण, चिकाटी आणि कार्यतत्परतेचे कौतुक करत सांगितले की, प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा, हा भारत निवडणूक आयोगाचा प्रमुख उद्देश आहे. अचूक माहिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि लोकसहभागाच्या बळावर ही मोहीम यशस्वी झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे तांत्रिक अडचणींवरही प्रभावीपणे मात करता आली.
जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, बीएलओ, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सामूहिक सहभागामुळे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम प्रभावीपणे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
लोकशाही बळकट करण्यासाठी पडद्यामागे निष्ठेने कार्य करणाऱ्या प्रत्येक बीएलओचे हे योगदान खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यांच्या समर्पित सेवेमुळे अधिक अचूक, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार होण्यास मोलाची मदत झाली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर