Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, August 1, 2026

दिग्रसमध्ये गुणवंतांचा अभूतपूर्व गौरव सोहळा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ५७१ गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार; पाच तास उभे राहून केला प्रत्येकाचा सन्मान


दिग्रस :(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)

शिक्षणातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि पालकांचे योगदान यांचा सन्मान करताना दिग्रसमध्ये गुरुवारी (दि. ३० जुलै) एक अभूतपूर्व सोहळा पार पडला. पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तब्बल ५७१ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसह भव्य सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, स्कूल बॅग, फाईल व उपयुक्त भेटवस्तू देण्यात आल्या, तर त्यांच्या यशामागील मोलाच्या योगदानाबद्दल पालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून सलग १७ वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा हा प्रेरणादायी उपक्रम दिग्रस येथील राजेश्वर मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवसेना, युवासेना, विद्यार्थीसेना आणि महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विशेष गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे फेटे बांधून वाजतगाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर गायक श्रीकांत टकले यांनी सादर केलेल्या "इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना हो" या प्रेरणादायी गीताने संपूर्ण सभागृह भारावून गेले.

यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुरू झाला. विशेष म्हणजे, ना. संजय राठोड यांनी तब्बल पाच तास व्यासपीठावर उभे राहून प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिकरित्या सत्कार केला. प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, तर पालकांनाही आपल्या पाल्याच्या यशाचा अभिमानास्पद क्षण अनुभवता आला. विद्यार्थ्यांसह पालकांचाही सन्मान होत असल्याने हा सोहळा दिग्रसकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमास शिवसेना पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख पराग पिंगळे, सहसंपर्कप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली मासाळ, बाळासाहेब दौलतकर, सुधीर देशमुख, राजकुमार वानखडे, उत्तम ठवकर, डॉ. संदीप दुधे, मिलिंद मानकर, नगर परिषदेचे शिक्षण सभापती डॉ. संजय बंग, बांधकाम सभापती नुरमोहम्मद खान, नियोजन सभापती बाळू जाधव, आरोग्य सभापती वैशाली दुधे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती धाडवे, बाबूसिंग जाधव, प्रा. प्रेम राठोड, संजीवनी शेरे, वर्षा निगोट, दुर्गा दुधे, माधुरी महल्ले, प्रावीणा अस्वार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास पद्मावार यांनी केले, तर सूत्रसंचालन पत्रकार सुरेंद्र मिश्रा, अमीन चव्हाण आणि संदीप रत्नपारखी यांनी केले.

चौकट १ : "मोबाईलच्या व्यसनातून मुक्त झाल्याशिवाय मोठे यश मिळणार नाही" – ना. संजय राठोड

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी सांगितले की, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज डिजिटल अभ्यासिका उभारण्यात आल्या असून स्पर्धा परीक्षेची महागडी पुस्तकेही मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजनेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यही दिले जात आहे. "तुम्ही मला भाऊ म्हणून हाक द्या, मी नक्कीच 'ओ' देईन," अशी भावनिक ग्वाही देत विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ आवश्यक आणि विधायक कामापुरताच करावा, मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहिल्याशिवाय मोठे यश मिळणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट २ : "पतंगाचा धागा कधीही तुटू देऊ नका; तो म्हणजे आई-वडील" – युवराज मेहेत्रे

लातूर येथील प्रख्यात करिअर मार्गदर्शक युवराज मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्याचे आवाहन केले. पालकांनीही मुलांवर अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या क्षमता आणि आवडीला प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले. "पतंग कितीही उंच भरारी घेत असला तरी त्याचा धागा तुटता कामा नये; तो धागा म्हणजे आई-वडील. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी त्यांचे संस्कार आणि मार्गदर्शन कधीही विसरू नका," या त्यांच्या हृदयस्पर्शी संदेशाला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर