Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, August 1, 2026

पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा!पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद

वाशिम / शेंदुरजना (अ) (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि गतिमान पद्धतीने मिळावा, यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठन व फेरपुनर्गठन केलेल्या पीक कर्जाचाही यामध्ये समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना रुपये २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेचा लाभ उपलब्ध आहे. तसेच विहित अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ५४,१०७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी ३१ जुलै २०२६ पर्यंत ३६,७२५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनीही विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले.

आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, विशिष्ट क्रमांक, कर्जखाते क्रमांक आणि कर्जरकमेची अचूकता तपासून मान्यता द्यावी. लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, विकास संस्था तसेच ग्रामपंचायत आणि चावडी येथे उपलब्ध आहेत.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम थेट लाभ वितरण पद्धतीने जमा करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था एम. एस. लटपटे, अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडील सहकार अधिकारी श्रेणी-२ जी. एन. कुकडे, वरिष्ठ लिपीक ए. बी. सावंत, कनिष्ठ लिपीक ए. डी. वानखडे तसेच लेखापरीक्षक श्रेणी-२ जी. एस. घुगे उपस्थित होते. यावेळी विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर