मानोरा : मानोरा तालुक्यातील वार्डा येथील रहिवासी वैजयंता भीमराव कांबळे (वय 55) या महिलेवर रविवारी (2 ऑगस्ट) सकाळी सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास मंगरुळपीर तालुक्यातील चिखलागड शिवारातील गट क्रमांक 148 मध्ये शेतात काम करत असताना रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हात, पाठ व जांघेला गंभीर जखमा झाल्या.
घटनेची माहिती मिळताच मुलगा भीमराव कांबळे व जितेंद्र कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी वैजयंता कांबळे यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे करताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. रानडुकरांचा वाढता वावर रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, वार्डा येथील सरपंच दीपक मनवर यांनी वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन जखमी वैजयंता भीमराव कांबळे यांना शासनाच्या नियमानुसार संपूर्ण नुकसानभरपाई मंजूर करावी. तसेच मंगरुळपीर तालुक्यातील चिखलागड शिवारात रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.नुकसानभरपाई व रानडुकरांच्या बंदोबस्ताची सरपंच दीपक मनवर यांची मागणी
No comments:
Post a Comment