मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा )
पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई प्रकाश डहाके यांनी मानोरा तालुक्याचा दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
यावेळी आमदार डहाके यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पावसाची स्थिती, पिकांची वाढ, पिकांचे नुकसान तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी पिकांची परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले.
आमदारांच्या या दौऱ्यात तहसीलदार राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आमदारांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनस्तरावरून मदत व आवश्यक उपाययोजना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणती ठोस कार्यवाही होते, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
दुष्काळाच्या सावटात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून परिस्थितीची पाहणी करणाऱ्या आमदार सईताई डहाके यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रशासनाच्या पातळीवर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment