*कायद्याचा वापर तलवार म्हणून नाही तर ढाल म्हणून करा;*
_श्रीमती मंगला कांबळे (सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण)_
*अमरावती‚दि.१२ मार्च २०२५:*
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहे. तथापि, महिलांनी कायद्याचा वापर नेहमी ढाल म्हणून करावा, तलवार म्हणून कायद्याचा वापर करू नये असे प्रतिपादन जिल्हा वरिष्ठस्तर न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती मंगला कांबळे यांनी केले‚ तर स्त्री मुक्तीची चळवळ याचा अर्थ पुरूषांविरूध्द चळवळ असा अर्थ कदापी होत नाही तर ती कालबाह्य सामाजिक चालीरीतिंपासून मुक्ती असे प्रतिपादन प्राचार्य श्रीमती ललिता देशमुख यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त महावितरण विभागीय प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे (दि.११ मार्च) आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अधीक्षक अभियंता दीपक देवहाते‚अधीक्षक अभियंता दिपाली माडेलवार‚ अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शालीनी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना श्रीमती कांबळे म्हणाल्या की‚आज सती प्रथा, केशवपन यासारख्या गोष्टी नाहीत‚ तरी पण समाजाला प्रबोधनाची गरज आहे‚ केवळ व्यक्तिगत अहंकार दुखावल्यावरून प्रकरण घटस्फोटापर्यंत आणि कोर्टापर्यंत जाते. सामंजस्याने जगायला शिकले पाहिजे‚ वाद होऊ नये याची काळजी महिला व पुरूष या दोघांनीही घेतली पाहिजे. पाळण्याची दोरी जर महिलांच्या हाती आहे‚ तर आपल्या बाळाला स्त्री पुरुष समानतेचे, चांगल्या संस्काराचे बाळकडूही महिलांनीच दिले पाहिजे.
यावेळी बोलतांना प्राचार्य श्रीमती ललिता देशमुख म्हणाल्या की‚ अनेक सामाजिक बंधने आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही सावित्रीबाईनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली, त्यासाठी स्वतः छळ सहन केला. काळाच्या ओघात आजच्या मुलींना सामाजिक शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रामध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, तथापि, सावित्रीबाईंच्या कष्टाची जाणीव आजच्या मुलींनी ठेवली पाहिजे. मिळालेल्या स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आजच्या काळात आपली विवाह संस्था आणि कुटुंब संस्था टिकवण्यासाठी सामंजस्य दाखवणे गरजेचे आहे.
यावेळी बोलतांना मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी म्हणाले की‚ सध्या महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून महावितरणच्या कामांमध्ये त्या अतिशय उत्तम योगदान देत आहेत.
No comments:
Post a Comment