Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, March 14, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाला विद्यापीठात रझाकरशाही रुजवायची आहे काय ?* - फुलसिंग जाधव सामाजिक कार्यकर्ता


     आज दिनांक १४ मार्च २०२५ रोजी  देशभर रंगपंचमीची धुमधाम चालू असतांना सोशियल मिडियावर छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांना बेगमपुरा पोलीस स्टेशन (छत्रपती संभाजीनगर) कडून बजावलेली नोटीस पाहण्यात आली. आणि मनाला प्रश्न पडला की, मराठवाडा हा भूभाग रझाकार मुक्त आहे की, अजूनही येथे रझाकारशाही नांदते आहे ?
   *डॉ. उमाकांत राठोड यांना पोलिसांनी बजावलेली नोटीस*
   पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर शहर. यांनी जा.क्र.पो.स्टे. बेगमपुरा/२०२५-278  दि. १४/०३/२०२५ नुसार बजावलेल्या नोटीस मध्ये असे म्हटलेले आहे की,
(भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे नोटीस)
आपणास कळविण्यात येते की, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा प्राधिकरणाची अर्थसंकल्पीय बैठक दि.१५/०३/२०२५ रोजी सकाळी ०८.०० ते संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महात्मा फुले सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आपणास या नोटीसव्दारे प्रतिबंध करण्यात येते की, आपणास कोणाविरुद्ध काहिएक अडचण हरकत असल्यास आपण रितसर मार्गाचा अवलंब करावा. आपल्यावतीने काहीएक अनुचित प्रकार घडुन आल्यास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणाविरुध्द प्रचलित कायद्याप्रमाणे कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल तसेच सदरची नोटीस आपणा विरुद्ध मा. न्यायालयात पुरावा म्हणुन सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. करिता आपणास बी.एन.एस.एस.१६८ प्रमाणे समजपत्र देण्यात येत आहे."
     डॉ. उमाकांत राठोड यांची फेसबुकवरील पोस्ट वाचून मी त्यांच्याशी संपर्क करुन प्रकरण जाणून घेतले असता त्यांचे म्हणणे असे होते की, "उद्या दिनांक १५ मार्च २०२५ रोजी विद्यापीठाच्या नियोजित सिनेट मिटींग आहे. या सिनेट मीटिंगमध्ये प्रत्येक सिनेट सदस्यांना तीन प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी तीन प्रश्न विचारले आहेत. या तिन्ही प्रश्नाला विद्यापीठाने दिलेली उत्तरे दिशाभूल करणारी आहेत. त्याचे सर्व कायदेशीर पुरावे माझ्याकडे आहेत. याशिवाय महत्वाचे म्हणजे विद्यापीठात नुकताच देशाचे उपराष्ट्रपती धनगड यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीदान समारंभ पार पडला त्यात एकाही विद्यार्थ्याला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक चिडलेले आहेत. हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. माझ्या प्रश्नांमुळे विद्यापीठ प्रशासनाचे बिंग फुटण्याची भिती त्यांना वाटत असावी म्हणून त्यांनी पोलीसाकडे माझ्या विरोधात तक्रार दिलेली असावी. कोणाच्या तक्रारीवरुन मला नोटीस देली गेली आहे असे पोलिसांना विचारले असता त्याचे कांहीही उत्तर ते देत नाहीत." 
  याच संदर्भात दुसऱ्या एका सन्माननीय सिनेट सदस्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा पदवीदान समारंभ हा वादाचा विषय असल्याचे सांगितले. याचा अर्थ विद्यापीठ प्रशासन पदवीदान समारंभामुळे अडचणीत आलेले दिसते.  आणि पोलीसांच्या माध्यमातून बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा केविलवाणा प्रयत्न दिसतो आहे.
      डॉ. उमाकांत राठोड यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मी सन्माननीय कुलगुरु डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याशी संपर्क केला असता दोघांनीही  फोन उचलला नाही. पण थोड्या वेळाने कुलसचिवांनी माझ्या msg ला पुढील प्रमाणे उत्तर दिले. "विद्यापीठ प्रशासनाकडून कोणत्याही व्यक्तीविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केलेली नाही."
    जर विद्यापीठ प्रशासनाने पोलीसांना कोणतीही माहिती दिली नसेल तर प्रश्न असा  पडतो की पोलीसांना स्वप्न पडले की काय ? " डॉ. उमाकांत राठोड हे १५ तारखेला विद्यापीठात दंगल घडवणार आहेत. त्यामुळे पोलिसांना राठोड यांना नोटीस बजावणे अनिवार्य झाले !" 
      विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना लेखी किंवा तोंडी कल्पना दिल्याशिवाय पोलीस त्यांना कसे काय नोटीस बजावू शकतात ? आणि सन्माननीय कुलसचिव म्हणतात की आम्ही कोणाविरुद्धही तक्रार दिलेली नाही. जर तक्रार दिली नसेल किंवा पोलीसांना कोणतीही माहिती दिली नसेल तर पोलीस विनाकारण कोणालाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावू शकतात काय ? काय हा वेडेपणा आहे. 
     *विद्यापीठ प्रशासनाला नम्र आवाहन*
     प्रकरण कांहीही असो. विद्यापीठ प्रशासनाने नको ते चुकीचे पायंडे पाडून विद्यापीठाला बदनाम करु नये. लोकशाहीत कोणाचाही आवाज दाबता येत नाही. आवाज दाबणे म्हणजे रझाकरशाहीला जन्म दिल्यासारखे आहे. आज एका सिनेट सदस्यांना सिनेटच्या बैठकीला येण्यापासून रोखले गेले तर उद्या दुसऱ्यांवर ही वेळ येणार नाही हे कशावरुन ? विद्यापीठाच्या इतिहासात न घडलेल्या घटना घडत असतील तर विद्यापीठाच्या या नासक्या प्रवृतीच्या विरोधात नाईलाजास्त्व शिक्षणप्रेमी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल.
   पोलिसांच्या बळावर सिनेट सदस्यांचा किंवा विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी विद्यापीठ प्रशासनाने चर्चेतुन मार्ग काढून ज्या महापुरुषांच्या नावाने हे विद्यापीठ चालते त्यांचे नाव डागाळणार नाही याची काळजी घ्यावी.
    आशा आहे विद्यापीठ प्रशासन सामंजस्याची भूमिका घेऊन डॉ. उमाकांत राठोड यांना पोलिसांनी बजावलेली नोटीस परत घ्यायला लावेल आणि उद्याच्या बैठकीस त्यांना सन्मानपूर्वक बैठकीला बोलावले जाईल. 
   *...अन्यथा राजभवनावर मोर्चा*
    विद्यापीठ प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून जर उद्याच्या बैठकीला डॉ. उमाकांत राठोड यांना येण्यास प्रतिबंध करण्यात आले तर हे प्रकरण खुप वेगळे वळण घेईल. या विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजवर न घडलेली घटना येथे घडत असेल आणि चुकीचा पायंडा पडत असेल तर मराठवाड्यातील तमाम शिक्षणप्रेमी जनतेला रस्त्यावर उतरुन विद्यापीठावर नव्हे तर थेट राजभवनावर येथील रझाकर प्रवृतीच्या विरोधात मोर्चा काढावा लागेल. ही बाब विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने  घ्यावी. 
       विद्यापीठ बदनाम होऊ नये, येथे चुकीचे पायंडे पडू नयेत याकरीता विद्यापीठ प्रशासनाला ईश्वर सद्बुद्धि देवो. 
 दिनांक : १४/३/२०२५
     *फुलसिंग जाधव*
     सामाजिक कार्यकर्ता
   छत्रपती संभाजीनगर
8999098265
--------------------------------

No comments:

Post a Comment

फॉलोअर