Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, June 10, 2025

सरकारने पत्नीपीडित पुरुषांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करु नये - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर

    दरवर्षी सौभाग्यवती महिला वटसावित्री पौर्णिमेला आपला पती कसाही असला तरीही सात जन्मी हाच पती मिळू दे म्हणून वटवृक्षाची पूजा मोठ्या उत्साहाने, श्रद्धा भावाने करतात. 
   दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी या गावी असलेल्या *पत्नीपीडित पुरुष आश्रमात* पत्नीपीडित पुरुष वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी करतात. आणि देवाला साकडे घालतात की सात जन्मी अशी भांडकुदळ बायको नको रे बाबा म्हणत कावळ्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन पिंपळाला उलट्या १०८ फेऱ्या मारतात. 
   चांगलवादामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंब व्यवस्थेला आज बऱ्याच विकृतीने घेरलेले आहे. त्यापैकीच कौटुंबिक कलह आहे. आज महिलांना संरक्षण देणारे अनेक कायदे आहेत. एखाद्या स्त्रीचा पतीकडून छळ झाला तर ती ताबडतोब पोलीस ठाणे गाठते, पण पत्नीपीडित पुरुषांसाठी ही व्यवस्था नसल्याकारणाने अनेक पुरुषांचे जीवन उद्ध्वस्त झालेले पहायला मिळते.
    पत्नीपीडित पुरुष आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर तो कधीही उठणार नाही एवढा कमजोर होतो. आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर त्याचे प्रचंड खच्चीकरण होते. हे ज्याच्या वाट्याला येते त्यालाच त्याच्या व्यथा, वेदना कळू शकतात. अन्य त्याची कल्पनाही करु शकणार नाहीत. म्हणून दरवर्षी पत्नीपीडित आश्रमात अन्यायग्रस्त पुरुषांची यमास विनवणी असते की, बायकोचे ऐकू नकोस !
 *कावळ्याची पूजा का ?*
      या पत्नीपीडित आश्रमात दररोज कावळ्याच्या मुर्तीची धुप अगरबत्ती लावून पूजा केली जाते. याशिवाय पत्नीपीडित पुरुषांचा व्हाट्सऐपवरील डीपीवर कावळा पक्षी आढळून येतो. यामागील कारण जाणून घेत असतांना एका पत्नीपीडित पुरुषांने त्यामागील कहाणी सांगितली. ती कहाणी अशी आहे- " मादी कावळी अंडी घालते आणि उडून जाते परंतु ती कावळी गेल्यानंतर नर कावळा पिलांची काळजी घेतो. त्या कावळीला तिच्या पिलांशी तिचे कांहीही घेणेदेणे नाही असे समजून ती निघून जाते. तद्वतच अनेक महिला मुलाबाळांचा विचार न करता मुलं पतीच्या हवाली करुन माहेरी निघून जातात. त्या कावळ्यासारखी गत पत्नीपीडित पतीची होते.  म्हणून कावळ्याच्या मूर्तीची पूजा या पत्नीपीडित आश्रमात नित्यनेम केली जाते.
*पत्नीपीडित आश्रम कशासाठी ?* 
    प्रारंभी हे आश्रम कांही लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय होता. पण आज या आश्रमाद्वारे अनेक पत्नीपीडित पुरुषांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी विविध प्रकारे मदत करुन सल्ला दिला जातो. विवाहित स्त्रियां अनेकदा खोट्या तक्रारी करुन मानसिक छळ करतात, जबरदस्तीने पोटगी मिळवतात. आणि त्यामुळे सामाजिक कुचंबना होऊन तो पुरुष चोहोबाजूंनी चिरडला होतो. अशा परिस्थितीत सापडलेल्या पुरुषांसाठी हे आश्रम मानसिक बळ आणि आधार देणारे केवळ राज्यातील नव्हे, देशातील नव्हे तर जगातील एकमेव पत्नीपीडित पुरुषांसाठी महत्वाचे एक केंद्र आहे. आज मितीला या आश्रमाशी ११,००० हून अधिक पत्नीपीडित पुरुष जोडले गेले आहेत. या पत्नीपीडित पुरुष आश्रमाचे अध्यक्ष अधिवक्ता भारत फुलारे हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शननाखाली या आश्रमाचे कामकाज चालते. कायदेशीर मार्गदर्शन करणारी ही एक संघटना आहे.
*पत्नीपीडित पुरुषांच्या  न्याय्य मागण्या कोणत्या आहेत ?*
   सामाजिक न्याय हा एकतर्फी न राहता तो दोन्ही बाजूंने असावा. अशी मागणी या आश्रमाकडून (संघटनेकडून) मागील अनेक वर्षांपासून सतत केली जात आहे. पत्नीपीडितांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत-

 *(१) राष्ट्रीय पुरुष आयोगाची तातडीने स्थापना करावी.*
*(२) खोट्या तक्रारींवर कठोर व लिंगनिरपेक्ष कारवाई आणि शिक्षेची तरतूद असावी.*
*(३) प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र सुरू करावे.*
*(४) पोलिस ठाण्यांमध्ये पुरुष दक्षता कक्ष तयार करणे.*
*(५) कौटुंबिक वाद वर्षभरात निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्याय प्रक्रिया निर्माण करणे.*
    वरील मागण्या अजिबात गैरवाजवी नाहीत. सरकारने या मागण्या मान्य करायला वेळ लावू नये असे वाटते. 
  *मंत्र्यावर बेतले तर कायदा करणार का ?*
     कौटुंबिक व्यवस्था पूर्णतः मोडकळीस आल्या कारणाने आज नाही तेवढ्या समस्या पारिवारिक स्तरावर निर्माण झालेल्या आहेत. आजकाल अनेक लग्न एक वर्ष सुद्धा  टिकत नाहीत. ही खुप मोठी चिंतेची बाब आहे. भौतिक प्रगतीकडे सर्वांचा कल असल्या कारणाने संस्कार मरत आहेत. परिवारात संस्कार होत नसल्यामुळे आणि झालेच तर ते टिकवले जात नसल्यामुळे आज पतिपत्नीत दुरावा वाढत जाऊन त्याचे घटस्फोटात रुपांतर होत चाललेले आहे. त्यात सोशियल मीडिया खलनायक होऊन बसलेला आहे.   
    आज अतिशय गुंतगुंतीची परिस्थिती बनलेली आहे. अशावेळी एकतर्फी न्यायाची व्यवस्था न राहता ती दोन्ही पक्षांसाठी सारखी असायला पाहिजे.
      पतीपीडित स्त्रियांचा ज्याप्रकारे विचार केला जातो, तोच विचार सरकारने पत्नीपीडित पुरुषांबाबतीत केला पाहिजे. न्यायाचा तराजू समान असला पाहिजे. तो असमान असता कामा नये. 
*सरकारात बसलेल्यांनी स्वतः पत्नीपीडित होण्याची वाट न पाहता पत्नीपीडित पुरुषांच्या वरील मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात.*
दिनांक : १०/०६/२०२५
     - *फुलसिंग जाधव*
    सामाजिक कार्यकर्ता
छत्रपती संभाजीनगर
  संपर्क : ८९९९०९८२६५
-----------------------------

No comments:

Post a Comment

फॉलोअर