मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) : उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दिनांक १८ जून २०२५ रोजी पोहरादेवी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आई जगदंबा प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी चित्राबाई वानखडे होत्या. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, प्रार्थना व जेंडर प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक वर्षा ठाकरे मॅडम विशेष उपस्थित होत्या. पोहरादेवी प्रभागात एकूण ९ ग्रामपंचायती असून १० ग्राम संघ स्थापन झाले आहेत. प्रभाग संघाच्या माध्यमातून गावस्तरावर महिलांचे सक्षमीकरण, गरीबी निर्मूलन, उपजीविका संधी निर्माण करणे, आर्थिक, सामाजिक व मानसिक सक्षमतेकडे वाटचाल करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
संघामार्फत समुदाय गुंतवणूक निधी, उत्पादक गट निधी, ग्राम संघ व्यवस्थापन निधी, जोखीम प्रवक्ता निधी, फिरता निधी व बँक कर्ज अशा वित्तीय सेवा मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत.
या आर्थिक वर्षात बालविवाह, हुंडा पद्धत, स्त्रीभ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसा यासारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रभाग संघाने एकत्रित आवाज उठवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. याशिवाय वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, विविध सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
सभेत प्रभागाच्या लिपिक वंदना शंकर खंडारे यांनी मागील आर्थिक वर्षाचा लेखी परीक्षण अहवाल सादर केला. तसेच पदाधिकारी बदल व आगामी वर्षाचे नियोजन यावर चर्चा झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MCRP ज्योतीताई खंडारे यांनी केले. CRP दिपालीताई विलायतकर यांनी प्रास्ताविक सादर केले तर बँक सखी साधनाताई कुंटे यांनी आभार प्रदर्शन केले.
सभेला समुदाय संसाधन व्यक्ती जोशीला आडे, कविता विलायतकर, नीता जाधव, बेबी केवटे, वंदना राठोड, दुर्गा कसबे, वेणू बोरकर यांची उपस्थिती लाभली. या सर्वांच्या सहभागातून सभा यशस्वीरीत्या पार पडली.
No comments:
Post a Comment