मानोरा :-- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) मानोरा तालुक्यातून सध्या राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे अशा दोन राष्ट्रीय प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत त्यापैकी एक असलेल्या अकोला आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम फक्त वाई गौळ (अमरगड) या गावात अनेक वर्षांपासून रखडलेले असून संपूर्ण रस्ता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावात चिखलामुळे निसरडा होऊन अपघातास सातत्याने आमंत्रण देत असल्याची ओरड स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
वाई गौळ (अमरगड) या गावात महान तपस्वी संत काशिनाथ महाराज यांचे धार्मिक देवस्थान असून या मंदिरात दर दिवशी असंख्य श्रद्धाळू दर्शनापोटी येत असतात.
मंदिर परिसरातच निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा असून आश्रम शाळेतील कर्मचारी तथा या शाळेत ज्ञानार्जन करण्यासाठी वाई गौळ आणि परिसरातील डे स्कॉलर विद्यार्थ्यांना गावाच्या मध्यभागातून गेलेल्या प्रचंड चिखलमय रस्त्यातून कसरत करत वाट काढावी लागते.
मानोरा तालुक्यात वाई गौळ या गावाच्या मध्यभागातून गेलेला हा विस्तीर्ण महामार्गच केवळ रखडलेला असून यामुळे स्थानिक नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे. रस्त्यावरील मोठे खड्डे व चिखलामुळे मोठ्या अपघाताची तलवार स्थानिक व बाहेरगावच्या वाटसरूंच्या डोक्यावर टांगलेली असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने तातडीने रखडलेला १६१ ए हा महामार्ग पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने स्थानिक नागरिक बाळगून असलेल्या संयमाच्या उद्रेकाची वाट न पाहता शक्य तेवढ्या लवकर गावाच्या मध्यभागातून गेलेला व रखडलेला महामार्ग त्वरेने बांधण्याच्या संतप्त व तीव्र भावना पुढे येत आहेत.
बॉक्स---
1.*राष्ट्रीय महामार्ग लगत माझा किरकोळ व्यवसाय असून दुकानात येणाऱ्या ग्राहकांवरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो मात्र अपूर्ण महामार्गावर प्रचंड चिखल झाल्याने कुणीही माझ्या दुकानात यायला धजावत नाही.*
--गोपाल महाराज, वाई गौळ (अमरगड)
2. *राज्यविधी मंडळ आणि देशाच्या संसदेमध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधींनी निवडणूक रणधुमाळीत या रस्त्याची खूपवेळा पायधूळ झाडली मात्र निवडून आल्यानंतर हा रखडलेला प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग व या भागात राहणारे नागरिक व प्रवासी यांच्याशी काही देणे घेणे नसल्याचे त्यांच्या निष्क्रियतेवरून समोर येत आहे.*
No comments:
Post a Comment