वाशिम, दि. ९ ऑगस्ट (साप्ता.दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना अरेरावी केल्याची बातमी विविध प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प संचालक, आत्मा – अनिसा महाबळे यांनी सविस्तर खुलासा केला आहे.
त्यांनी सांगितले की, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण भवन येथे “शाश्वत शेती दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांचे तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, महाविस्तार ॲपचा वापर, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी, तसेच मूल्यवर्धन साखळी या विषयांवर शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी ११.३० वाजेपर्यंत अधिकारी , कर्मचारी व शेतकरी मिळून जवळपास ६० जण उपस्थित होते. मात्र कार्यक्रमादरम्यान अधिक शेतकरी सहभागी झाल्याने उपस्थिती वाढून १५० ते २०० झाली. या वाढीव उपस्थितीचा विचार करून तत्काळ अतिरिक्त जेवणाची व्यवस्था करण्यात आली, परंतु त्यासाठी काही वेळ लागल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला.
महाबळे यांनी सांगितले की, या दरम्यान काही शेतकरी व कॅटरिंग प्रतिनिधींशी संवाद सुरू असताना व्हिडिओ चित्रिकरण झाले. या प्रसंगाबाबत काही गैरसमज निर्माण झाले असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी अरेरावी किंवा अवमानकारक वर्तन झाल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आहे.
शेतकऱ्यांबाबत माझा दृष्टिकोन नेहमीच आदर, जिव्हाळा आणि सहकार्याचा राहिला आहे आणि तो पुढेही कायम राहील, असे महाबळे यांनी ठामपणे नमूद केले.
No comments:
Post a Comment