मनोरा : ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
महिलांच्या आरोग्याच्या जाणीवेतून आणि सशक्त परिवार घडविण्याच्या उद्देशाने “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय, मानोरा येथे करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवारी, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी दिवसभर चालणार असून यामध्ये वाशिम येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार सेवा देण्यात येणार आहेत.
ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने तालुक्यातील सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिलांचे आरोग्य, मातृत्व व बालसंगोपन, रक्तदाब, मधुमेह, स्त्रीरोग, कुपोषण, तसेच सर्वसाधारण आजारांचे तपासणीसह मोफत सल्ला व उपचार यांचा समावेश या शिबिरात असेल. आवश्यकतेनुसार औषधे व पुढील उपचाराची माहितीही दिली जाणार आहे.
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मानोरा यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. या शिबिराचा उद्देश महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल सजग करणे आणि वेळेवर तपासणी करून आजार टाळणे हा आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषत: महिलांनी, या शिबिरात सहभागी होऊन आपली तपासणी व उपचार करून घ्यावेत.”
ग्रामीण रुग्णालय मानोरा व जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले असून आवश्यक सुविधा, नोंदणी आणि तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment