मुंबई : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीपासून या परंपरेत नव्याने समाजसेवकांचा समावेश होणार आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार ५१,१११ रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असा असेल. रामशेठ ठाकूर यांनी परिषदेकडे ठेवलेल्या ठेवीतून हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. या वर्षीचे पुरस्कार फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रदान करण्यात येतील.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडे विविध मान्यवरांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी दहा पत्रकारांचा गौरव केला जातो. याशिवाय परिषद स्वतःच्या निधीतून एका ज्येष्ठ पत्रकाराला ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करते. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
यावर्षीपासून समाजसेवा व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या एका मान्यवर व्यक्तीचा ‘लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार्थींची निवड एका निवड समितीकडून करण्यात येईल.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील परिषदेचे पुरस्कार हे मानाचे समजले जातात. आता समाजसेवकाचा सन्मान केल्याने परिषदेच्या पुरस्कारांची उंची आणखी वाढणार आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने एस.एम. देशमुख, मिलिंद अष्टीवकर आणि पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी नुकतीच पनवेल येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
No comments:
Post a Comment