मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क):
मानोरा तालुक्यात अवैध धंद्यांना अक्षरशः सोन्याचे दिवस आले असून, वरली मटका, जुगार, क्लब, हातभट्टी दारू, अवैध वाहतूक आणि देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री जोमात सुरू आहे. स्थानिक पोलीस ठाण्याचा आशीर्वाद असल्याची जोरदार चर्चा असून, त्यामुळे गुन्हेगारांना अक्षरशः रानमोकळे झाले आहे.
तालुक्यातील गावागावांत जुगाराचे अड्डे उघड्यावर सुरू आहेत. यवतमाळ, अमरावती, अकोला व वाशिम जिल्ह्यातील जुगारी येथे खेळण्यासाठी धावत येत आहेत. मानोरा शहरात वरली मटक्याचे कट्टे ठिकठिकाणी उघड्यावर सुरू आहेत. गावोगाव हातभट्टी व देशी दारू सहज उपलब्ध असल्याने कित्येकांच्या संसाराचे तीन तेरा वाजले आहेत.
या अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांना दमदाटी करून गप्प केले जात असल्याने सामान्य नागरिकही मौन बाळगून आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील इतर भागात अवैध धंद्यांवर कारवाई होत असताना केवळ मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ते खुलेआम सुरू राहणे म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा असूनही कारवाईचा अभाव दिसतो. त्यामुळे या अवैध धंद्यांवर गंडांतर आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी स्वतः हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment