Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, September 8, 2025

साखर डोह ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाचा घोटाळा उघड घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून मस्टर रकमेपासून वंचित; ग्रामस्थांत संताप


साखरडोह :( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
ग्रामपंचायत साखर डोह येथील रोजगार सेवकाने घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर असलेली मस्टरची रक्कम आपल्या जवळच्या लोकांच्या खात्यात जमा केल्याने अनेक गरीब नागरिक गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित राहिले आहेत. या प्रकरणामुळे ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून शासनाने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मागणी होत आहे.

सन 2021-22 मध्ये गावातील बेघरांना घरकुल योजनेची मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी आपली घरे पूर्ण केली. बांधकामाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले; मात्र रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणारी मजुरीची रक्कम आजतागायत त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना सरपंच, सचिव, पंचायत समितीचे अभियंता व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी कराव्या लागल्या.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बळवंत भगत यांनी माहितीच्या अधिकारातून चौकशी केली. त्यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी अर्ज दाखल करून रमाई, मोदी, प्रधानमंत्री व शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरे व मस्टरची माहिती मागितली. त्यासाठी ग्रामपंचायतीने 1454 रुपये शुल्क आकारले. त्यानंतर भगत यांना 199 मस्टरांची जवळपास 300 पानी यादी देण्यात आली. मात्र त्यातूनही समाधानकारक माहिती न मिळाल्याने ते पुढे अपील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रमाई आवास योजनेत 43 पैकी 39, मोदी आवास योजनेत 40 पैकी 32, तसेच इतर योजनांतही बहुसंख्य लाभार्थ्यांची घरे पूर्ण झाली. तरीसुद्धा रोजगार हमी योजनेची रक्कम लाभार्थ्यांना मिळाली नाही. उलट रोजगार सेवकाने काही महिलांसह 20 ते 25 जवळच्या लोकांचे जॉब कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स स्वतःजवळ ठेवून त्याच खात्यांत मस्टरची रक्कम जमा केली. इतकेच नव्हे तर काहीवेळा आपल्या नातेवाईकांच्या खात्यातदेखील ही रक्कम वळविण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या घोटाळ्यामुळे गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रति घरकुल सुमारे 26,400 रुपयांची रक्कम दिली जाते. गेल्या काही वर्षांपासून या रकमेवर रोजगार सेवकाने डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वीही याच रोजगार सेवकाने गावातील सतीश गोविंदराव भगत यांच्या फळबाग प्रकल्पाची मजुरीची रक्कम आपल्या जवळच्या लोकांच्या खात्यात जमा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचेही आर्थिक नुकसान झाले होते.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, “जॉब कार्ड धारकांचे नाव देऊनसुद्धा मस्टरची रक्कम चुकीच्या खात्यात वळविण्यात आली. त्यामुळे शासनाने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात कोणतीही अट न ठेवता रक्कम जमा करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या गंभीर प्रकरणाकडे शासनाने लक्ष घालून वंचितांना न्याय द्यावा, हीच साखर डोह ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर