मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
डीजेचा दणदणाट, लेझर लाईट्सचा झगमगाट आणि आधुनिक दिखावा विसरून मानोऱ्यातील ‘मार्केटचा राजा’ मोरया गणेशोत्सव मंडळाने यंदा पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून एक वेगळाच आदर्श घालून दिला. मंडळाने शाडू मातीची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती स्थापित केली होती. विसर्जन मिरवणुकीत हरिनामाचा गजर, ताल-मृदंगाचा निनाद, पावली, रिंगण, अश्व आणि पारंपरिक खेळांमुळे वातावरण भारावून गेले. या उपक्रमाचे पोलीस प्रशासनानेही कौतुक करून विशेष सत्कार केला.
पर्यावरणपूरक मूर्ती व साधेपणातली आकर्षक सजावट
मंडळाने यंदा वारीची थीम साकारत शाडू मातीची मूर्ती तयार केली होती. मूर्तीपासून ते सजावटीपर्यंत सर्वत्र साधेपणा आणि पर्यावरणाचा संदेश यावर भर देण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देणारी ही संकल्पना सर्वत्र कौतुकास पात्र ठरली.
डीजेमुक्त पारंपरिक मिरवणूक
आजच्या काळात विसर्जन मिरवणुकीत डीजे व लेझर लाईट्सची रेलचेल असते. मात्र ‘मार्केटचा राजा’ मंडळाने याला पूर्णविराम देत हरिपाठ मंडळांसह हरिनामाचा गजर आणि मृदंगाच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढली. पारंपरिक पावली, फुगडी आणि अश्वांच्या खेळांनी वातावरण उत्साहात न्हाऊन निघाले. नागरिकांसह पोलीस प्रशासनही या मिरवणुकीने मंत्रमुग्ध झाले.
पोलीस प्रशासनाकडून विशेष गौरव
या आदर्शवत उपक्रमाची दखल घेत विसर्जनावेळी पोलिसांनी मंडळातील कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी, “इतर मंडळांनीही ‘मार्केटचा राजा’ मंडळाचा आदर्श घेत पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा,” असे आवाहन केले.
समाजासाठी नवा संदेश
गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नव्हे तर सामाजिक जबाबदारीही आहे, हे ‘मार्केटचा राजा’ मंडळाने आपल्या कृतीतून दाखवून दिले. पर्यावरणाचे रक्षण आणि परंपरेचे संवर्धन याचा समतोल साधणाऱ्या या उपक्रमाने इतर मंडळांसमोर एक आदर्श ठेवला आहे. भविष्यात अधिक मंडळे या मार्गाने पुढे जातील, अशी आशा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment