वाशिम, दि. १५ ऑक्टोबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) “वाचन माणसाला प्रगल्भ, बहुश्रुत आणि ज्ञानी बनवते. अफाट वाचन व अभ्यासामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजक्रांती घडविली. वाचन ही क्रांतिकारी बाब आहे; ती आपले व्यक्तिमत्त्व घडवते आणि आयुष्य समृद्ध करते,” असे प्रतिपादन व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. विजयराव जाधव यांनी केले.
जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम व व्यंकटेश सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. जाधव होते. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे, निवृत्त प्राचार्य भास्कर गायकवाड, सतीश राठी स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रंगनाथ पांडे, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय सदस्य प्रा. गजानन वाघ, तांत्रिक सहाय्यक नरेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोबाइलच्या वापरामुळे पुस्तक वाचनावर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करून अॅड. जाधव म्हणाले, “क्रमिक पुस्तकांपेक्षा अवांतर पुस्तके मनावर खोल संस्कार करतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा जागृत करण्यासाठी शिक्षक व पालकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे.”
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. उत्कृष्ट वाचक म्हणून राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त प्राचार्य भास्कर गायकवाड यांनी आपले वाचनानुभव कथन केले. ग्रामीण कथा-कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी विद्यार्थ्यांना लेखन व वाचन प्रक्रिया समजावून सांगितली. प्रा. गजानन वाघ आणि डॉ. विजय काळे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
सौ. सुशीलाताई जाधव विद्यानिकेतनचे प्राचार्य श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर महेश कढणे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाचे स्पष्टीकरण करताना जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा ग्रंथालय तसेच २८८ शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. रामा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य दुर्गा कढणे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथप्रदर्शनाचे आकर्षण
राजे वाकाटक वाचनालयाने भरविलेले ग्रंथप्रदर्शन हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणबिंदू ठरला. बालसाहित्य, कथा, कादंबऱ्या, नाटके, प्रेरक साहित्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांनी विद्यार्थी आणि पालकांना वाचनाची प्रेरणा दिली. ग्रंथपाल संतोष काळमुंदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रदर्शनासाठी विशेष परिश्रम घेतले.
चौकट : वाशिम जिल्हा ग्रंथालयाची माहिती
वाशिम जिल्हा ग्रंथालयात सुमारे ६५,००० पेक्षा अधिक ग्रंथ, २२ वर्तमानपत्रे, ५० नियतकालिके तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथसाठा उपलब्ध आहे. येथे मोफत वाचनाची सुविधा आहे. घरी ग्रंथ नेण्यासाठी केवळ १०० रुपयांत दोन वर्षांचे सभासदत्व मिळते. लहान मुलांसाठीही मोफत वाचनसेवा उपलब्ध असून नागरिकांनी या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी केले.
No comments:
Post a Comment