वाशिम,दि.२५ ऑक्टोबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस )
रिसोड येथील स्थानिक रहिवासी संतोष वाघमारे यांच्या मातोश्री स्व. सिंधुताई पुरुषोत्तम वाघमारे (वय ८१ वर्षे) यांचे दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.५० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने वाघमारे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुटुंबातील आधारस्तंभ, सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या आणि समाजकार्याची आवड असलेल्या स्व. सिंधुताई यांच्या निधनानंतरही वाघमारे परिवाराने अत्यंत प्रेरणादायी निर्णय घेतला — मरणोत्तर नेत्रदानाचा.
दुःखाच्या या प्रसंगातही दोन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण व्हावा या उदात्त हेतूने वाघमारे कुटुंबीयांनी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. आशिष बेदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी सुधिर साळवे, नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे व संदीप पोफळे यांनी स्व. सिंधुताई यांचे नेत्र काढले.
काढलेले नेत्र त्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे नेण्यात आले. या मानवसेवेच्या कार्यासाठी वाघमारे कुटुंबीयांचे सहकार्य व पुढाकार कौतुकास्पद ठरले आहे.
कोट:
समाजातील प्रत्येकाने या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा
. मृत्यूनंतर आपल्या जवळच्या व्यक्तीचे नेत्रदान घडवून आणावे आणि नेत्रदानानंतरच अंतिम संस्कार करावेत, जेणेकरून अधिकाधिक अंधांच्या जीवनात उजेड निर्माण होईल.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे
नेत्रदानासाठी संपर्क : ९९२२५१९९४८ (जिल्हा रुग्णालय, वाशिम)
No comments:
Post a Comment