Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, November 28, 2025

महाराष्ट्र अधोगतीकडे झुकतो आहे काय ? डॉ. अनंतकुमार सूर्यकार

यवतमाळ (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस )

मित्रांनो, आपण ' सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम् ' अशा समृद्ध देशात जन्माला आलो हे आपले भाग्यच म्हणावे .  हा देश पूर्वीपासून सुखी संपन्न व वैभवाची साक्ष देतो . साहित्य, कला, नैतिकता, युद्धनीती, समानता , शिक्षण ही वैभवशाली परंपरा येथील ग्रंथ, ऋषी, महंत, संत , राजे - महाराजे यांच्या चारित्र्यावरून दृष्टोत्पत्तीस येते . 
' भारत ' या शब्दाचा अर्थ ' वृद्धी ' किंवा ' विस्तार ' असा होतो. धर्माच्या साहित्यात म्हणजे वैदिक वाङ्मयात ' भारतवर्ष ' असे संबोधले आहे. प्रसिद्ध इतिहासकार हेरोडोटस यांनी , सिंधू नदीच्या खोऱ्यातील लोकांपासून ते पर्शियाच्या पूर्वेकडील लोकांपर्यंतच्या लोकांना ' भारतीय ' असे म्हटले आहे. राजा अल्फ्रेड यांनी ' पॉलस ओरोसियस ' च्या भाषांतरात ' भारत ' हा शब्द वापरला आहे. १९५० च्या संविधानाच्या कलम १ मध्ये ' भारत ' हे संस्कृत नाव तर इंग्रजीमध्ये ' इंडिया ' नाव स्वीकारले. काही लोक ' हिंदूश ' या नावानी संबोधायचे . सिंधूवरून ' हिंदू ' ची निर्मिती झाली तसेच  आर्यांच्या भरत नावाच्या टोळीवरून ' भारत ' हे नाव झाले असावे. दुष्यंत राजाच्या मुलाचे नाव ' भरत ' होते त्यावरून ' महाभारत ' या ग्रंथाची रचना केली असावी. असाही तर्क लढवल्या जातो . मौर्य काळात मेगॅस्थेनिसने ' इंडिका ' नामक ग्रंथ लिहिला त्यावरून इंडिया असे नामाभिधान केले गेले असावे . या देशाला भारत, हिंदुस्थान, आर्यावर्त, रेवाखंड, जंबुद्विप व इंडिया असे म्हटले तरी कोणी आक्षेप घेणार नाही. आसेतुहिमाचल असा हा प्रसन्न उपखंड सर्वांनाच सामावून घेतो . प्राचीन काळापासून तर आजतागायत या देशावर जगातील सर्वच धर्मियांनी,  विचारांनी व संस्कृतीनी आक्रमणे केलीत . सत्ता भोगली आणि जेवढे लुटायचे होते ते सर्वच लुटून घेऊन गेले, परंतु आपल्या विचारांच्या खूणा इथे ठेवून गेलेत . तरीही हा देश आजही सर्वांना घेऊन सुखात जगवतो आहे आणि जगत आहे.  
अनेक वर्षांपासून अनेक देशांतील राजांनी तलवारीच्या बळावर या भारतवर्षात राज्य केले. राज्य करणारा कोणत्याही धर्माचा असो, परंतु देशातील जनता सुखी व समाधानी होती . बाहेरून आलेल्या आणि शासन करणा-या राजांना इथल्या बुद्धिवान जमातीनी आपल्या हातचे बाहुले बनवून येथील धर्म, जातीच्या उतरंडीची माहिती द्यायला सुरुवात केली. शासन दरबारी आपले प्राबल्य वाढविण्यात ते यशस्वी झाले. कुणाची सत्ता उलथून टाकायची व कुणाला सहकार्य करायचे या कूटनीतीने वावरायला लागले. धर्मभेद व जातिभेद कायम ठेवण्याचे तंत्र आपल्या हातात ठेवले. राजाला फक्त सत्ता महत्वाची असायची . या भारतखंडाचा इतिहास जर बघितला तर रोमहर्षक आहे. बहामणी, लोदी, तुघलक, बल्बन , गुलाम, सुलतान, मोगल, स्पॅनिश, डच, फ्रेंच, पर्शियन, पोर्तुगीज, इंग्रज इत्यादी परकियांनी या देशावर साम्राज्यवादी धोरण राबविले. शेवटची शासनकर्ती जमात म्हणून इंग्रजांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. इंग्रज सत्तेचा अंमल बदलून टाकण्यासाठी आम्हा भारतीयांना फार उशिरा जाग आली. तोपर्यंत इंग्रजी सत्तेची पाळेमुळे खोलवर गेलेली होती. या देशात राहणाऱ्या हिंदू, मुसलमान, बौद्ध, जैन, शिख या सर्वांनाच इंग्रजी सत्तेच्या वेदना होत होत्या. वरील सर्व धर्मियांनी एकत्रित येऊन ' स्वातंत्र्य युद्ध ' पुकारले. या स्वातंत्र्य युद्धात कोण्या एकट्याचा सहभाग नव्हता तर सर्व जनता संघटितपणे लढण्यास तयार होती . १८५७ पासून १९४७ पर्यंत या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात सर्व धर्मियांच्या समिधा जळून खाक झाल्या.
१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्याच्या हर्षोल्लासात तिरंगा फडकवल्या गेला . याचवेळी दु:खद गोष्ट झाली ती म्हणजे हिंदुस्थानचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान या राष्ट्राची निर्मिती झाली. युनियन जॅक खाली उतरवून इंग्रज चालते झाले. सत्तेचे आम्ही वारसदार झालो . भारतीय घटना लिहिली गेली. भारतीय घटनेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद तर भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेबांनी ' भारतीय संविधान ' समितीला व देशाला अर्पण केले . 
           ⚫   उद्देशिका   ⚫
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस ;
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व 
उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा 
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता 
यांचे आश्वासन देणारी बंधुता 
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी 
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत .
ही केवळ भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे.याप्रमाणे कायद्याचे शासन निर्माण झाले. स्वातंत्र्य प्राप्तीकरिता ज्या पुढा-यांनी व समाजसेवकांनी प्रयत्न केले त्यांनी देश सांभाळायचे ठरवले. घटनेप्रमाणे शासन व प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीला देशाचा कारभार पाहणारी नेतेमंडळी नि: स्वार्थपणे देशहितासाठी व विकासाच्या मागे होती . भारताने  लोकशाही शासनप्रणाली स्वीकारल्याने जनतेलासुद्धा आपलेच शासन आहे असे वाटायला लागले. केवळ आणि केवळ राष्ट्रसेवा हे ब्रीद प्रत्येक नेत्यांमध्ये होते. लोकशाहीप्रणालीनुसार सांसदीय शासनव्यवस्थेला अनुसरून वराज्यसभा व लोकसभा दोन सभागृहे तसेच काही घटक राज्यात दोन विधिमंडळे ( विधानसभा व विधानपरिषद ) तर काही घटक राज्यात एकच विधिमंडळाच्या सभागृहानुसार कारभार चालतो. लोकसभा, विधानसभा निवडणूक पाच वर्षांनी तर राज्यसभा व विधानपरिषद निवडणूक सहा वर्षांनी व्हायला लागली. भारतीय लोकशाहीने बहुपक्ष पद्धती स्वीकारल्याने अनेक पक्ष निर्माण झाले. विविध संघटनेमधून स्वतंत्र पक्षाची निर्मिती झाली. काही राष्ट्रीय स्तरावरील पक्ष तर काही जात, धर्म, भाषा व प्रांतानुसार पक्ष निर्माण झाले. काही पक्षांनी धर्माचा नामोल्लेख न करता अप्रत्यक्ष धर्माचा वापर करूनच पक्ष बांधणी केली. काही पक्षांनी  धर्मनिरपेक्ष मूल्य जोपासून पक्ष बांधणी केली. डावे, उजवे असे पक्ष निर्माण झाले.  स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या कारभाराला सुरुवात केली. कॉंग्रेस पक्षाचा सुवर्णकाळ डॉ मनमोहनसिंग यांचेपर्यत दिसतो . १९५२ ते २०१४ पर्यंत भरपूर काळ कॉंग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. मधल्या काही काळात गैरकॉंग्रेसी सरकारसुद्धा होते. प्रामुख्याने विश्वनाथ प्रतापसिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, एच. डी. देवेगौडा व अटलबिहारी वाजपेयी हे गैरकॉंग्रेसी प्रधानमंत्री राहिले आहेत.
मित्रांनो, भारतीय राजकारणात व सामाजिक व्यवस्थेत अलीकडील काळात राष्ट्रीय पक्षापेक्षा प्रादेशिक पक्ष किंवा धर्म, जात व  महापुरुषांच्या नावानी पक्षाला उधाण आले. राष्ट्रीय पातळीवर व राज्य पातळीवर धर्माच्या, जातीच्या व महापुरुषांच्या नावानी निवडणूक होत आहे. यामुळे देशाने जी धर्मनिरपेक्ष तत्त्व प्रणाली स्वीकारली तिला आहे ती हद्दपार होते की काय ? असे भारतीय जनतेला वाटायला लागले आहे. धर्म, जाती, मंदिर, मशिद, गिरिजाघर  , गुरुद्वारा, विहारे या माध्यमातून तरूणांची डोकी भडकावल्या जात आहेत. राजकीय नेते पूर्वीच्या पुढा-यांसारखे नि: स्वार्थी राहिले नाही.  ग्रामपंचायतपासून तो लोकसभेपर्यंत जो लोकप्रतिनिधी निवडून दिल्या जातो तो काही दिवसांतच गडगंज संपत्तीचा मालक होतो . हे कसे काय होते ?  धर्म, जातीच्या नावावर निवडून आल्यानंतर मंत्री बनतात . कोणत्याच सभागृहात बोलण्याची पात्रता नसते असे प्रतिनिधी अब्जाधीश होतात. कारखानदार, उद्योगपती, शिक्षणसम्राट, सहकारसम्राट कसे बनतात? हे सर्व जनतेला माहीत आहे. जनता ही डोळे बंद मतदान करतात त्यामुळे गुंड व पुंड लोकांचे साम्राज्य वाढत जाते. नि:स्वार्थ सेवा कोणत्याही मंत्र्यांमध्ये किंवा लोकप्रतिनिधीमध्ये राहिली नाही. राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरचे अनेक प्रश्न व समस्या असतात त्यांना न्याय न देता दर पंचवार्षिक निवडणुकीत तेच ते निवडून येतात. घराणेशाहीचा मुद्दा कॉंग्रेसच्या बाबतीत लोक बोलायचे, परंतु आता तर सर्वच पक्षात घराणेशाही आणि पक्ष बदल दिसत आहेत. पक्षांशी निष्ठा न ठेवणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विचार, निष्ठा, राष्ट्रवाद, विकास ह्या प्रणालीचे काही देणे घेणे राहिले नाही. दररोज टीव्हीवर येणारे आणि काहीही अवास्तव बडबड करणारे भरपूर झाले आहे.देशातील , राज्यातील समस्या राहिल्या बाजूला बस त्यांचे वैयक्तिक व पक्षीय हेवेदावे सुरू. अशा वात्रट लोकांना निवडून का देतात ? हे कळत नाही. जनतेला अज्ञानी म्हणावं की  , निवडून येणा-या प्रतिनिधीला अज्ञानी म्हणावं कळतच नाही.
अलीकडील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात व सत्तापिपासू लोकांत फार बदल दिसत आहेत. जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मंत्री म्हणून जी शपथ घेतल्या जाते ती भारतीय संविधानाला साक्षी ठेवूनच. महाराष्ट्रात गुंडगिरीच्या राजकारणाला उच्च स्थान मिळत आहे. महाराष्ट्रातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना आज शिकवणी लावायची वेळ आली आहे. आपण जनतेचे प्रतिनिधी आहात. कसे, कुठे, कधी व काय बोलावे हे कळत नसेल तर आपली लोकप्रतिनिधी राहण्याची लायकी आहे काय ?  महाराष्ट्रात तर असे वाटायला लागले की, बहुमताच्या बळावर सत्ता असल्यामुळे तर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होत असावी का ? मित्रांनो, लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत आहे, परंतु एवढेही बहुमत असू नये की, जिथे विरोधी पक्षच शिल्लक राहू नये. या बहुमतांमुळे शासक व मंत्री हुकूमशाही पद्धतीने कार्य करतात. आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही. ही धारणा होते. सध्या महाराष्ट्रात हेच चालू आहे. कोणत्याही धर्माच्या नावाखाली राजकारण करून लोकांचे डोके भडकवू नये. सत्ताधीशांनी भारतीय संविधानाला साक्षी ठेवून जी शपथ घेतली त्यानुसार सर्वांसोबत समान वागणूक ठेवावी . कोणाही बद्दल अभद्र किंवा भावना दुखतील असे बोलू नये आणि सध्या हेच भडकावू बोलणे सुरू आहे. कोणत्याच महापुरुषांबद्दल अपशब्द बोलू नये तो धर्माचा असो वा इतर धर्मांचा असो . समाजात वितूष्ट निर्माण व्हायलाच नको. प्रक्षोभक भाषण, विधान, शिविगाळ, दंगली करायलाच नको. दंगली जेव्हा घडतात तेव्हा सरकार विरोधकांच्या नावानी खडे फोडतात . इथे तर सत्ताप्राप्त असलेले प्रक्षोभक बोलण्याने दंगली उसळत आहेत. सरकारला काय साध्य करायचे आहे ? महाराष्ट्र धगधगत ठेवायचा आहे काय ? हेच दिसते. छत्रपती शिवाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले  व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. तरूणांना काम द्या, नौकरी द्या, शेतक-यांच्या मालाला योग्य भाव द्या, महिलांवरील अत्याचार थांबवा, पोलीसांचा सन्मान ठेवा, गुंडगिरी संपवा, तस्करी हटवा असे विविध मुद्दे राहिले बाजूला अन् निघाले महाराष्ट्र अधोगतीकडे न्यायला.

" जय जय महाराष्ट्र माझा
  गर्जा महाराष्ट्र माझा... "

डॉ अनंतकुमार सूर्यकार, मांगूळ यवतमाळ.
९४२१७४६८२२
चिटणीस, यवतमाळ जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समिती.

No comments:

Post a Comment

फॉलोअर