मानोरा( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
मानोरा तालुक्यातील वरोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या एकूण पाच वर्गांसाठी केवळ एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आल्याने शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळपणा उघड झाला आहे. प्रशासनाला गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी नसल्याचा गंभीर आरोप विदर्भ शिक्षक संघटनेचे प्रांतीय सरकार्यवाह नामा जाधव यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.
तीन शिक्षकांचे बदलीनंतर रिक्त पदे; फक्त एकच शिक्षक रूजू
वरोली हे गाव मानोरा तालुक्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे जिल्हा परिषद शाळेत गरीब, मागासवर्गीय बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, तीन महिन्यापूर्वी शाळेतील तीन शिक्षकांची बदली झाली असून त्यांच्या जागी फक्त एकच शिक्षक रुजू झाला आहे. परिणामी, इयत्ता पहिली ते पाचवी या सर्व वर्गांचा भार एका शिक्षकावर आल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.
ग्रामस्थांची मागणीही प्रशासनाकडून दुर्लक्षित
स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा पंचायत समितीकडे शिक्षक नेमणुकीची मागणी केली, परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नामा जाधव यांनी केला आहे.
“गरीबांच्या मुलांनी शिकूच नये का?” असा तीव्र सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सात दिवसांत शिक्षक न दिल्यास आंदोलनाची चेतावणी
विदर्भ शिक्षक संघटनेने या शाळेस तातडीने किमान दोन शिक्षकांची अतिरिक्त नियुक्ती करावी, अशी मागणी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम तसेच शिक्षक आमदार सुधाकर आडबले आणि अमरावती विभागाचे शिक्षक आमदार यांच्याकडे केली आहे.
संघटनेने सात दिवसांच्या आत शिक्षक न दिल्यास पुढील भूमिका जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment