मानोरा –(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआय हमीभाव कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू असताना, सातबारा स्वीकारण्याबाबत निर्माण झालेला गोंधळ अखेर सुटला आहे. या प्रकरणात पोहरादेवी ता. मानोरा येथील तरुण शेतकरी मार्गदर्शक श्री. विजय अनंतकुमार पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळवून दिला.
❖ सातबारा मान्य नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ
श्री. पाटील यांनी कापूस नोंदणीसाठी तलाठी कार्यालयातून डिएसीवर सही-शिक्क्यासह सातबारा घेतला होता. मात्र नोंदणीदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. मनोज इंगोले यांनी हा सातबारा मान्य नसल्याचे सांगितले.
त्यांनी शेतकऱ्यांना "शेतू केंद्रावरून डिजिटल सातबारा आणावा" असे निर्देश दिले. परंतु गेल्या ३–४ दिवसांपासून डिजिटल सातबारा साइट बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.
❖ “तलाठी सातबारा चालतो” – उपसंचालक स्नेहा जोशी
या गंभीर स्थितीत श्री. विजय पाटील यांनी थेट पनन संचालनालय, पुणे येथील महाराष्ट्र राज्य उपसंचालक सौ. स्नेहा जोशी मॅडम यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सातबारा व्हॉट्सअॅपवर पाठवून मार्गदर्शन मागितले.
उपसंचालक जोशी मॅडम यांनी स्पष्ट सांगितले की –
“बारकोड असलेला महसूल विभागाचा (तलाठी कार्यालयाचा) सातबारा पूर्णपणे वैध आहे व त्यावर शेतकऱ्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.”
त्यामुळे तलाठी कार्यालयाचा सातबारा नाकारता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
❖ शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा
उपसंचालक यांच्या निर्देशांनंतर श्री. विजय पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री. इंगोले यांना पुन्हा संपर्क करून ही माहिती दिली. परिणामी तलाठी कार्यालयाचा सातबारा नोंदणीस स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
❖ शेतकऱ्यांना विजय पाटील यांचे आवाहन
शेतकऱ्यांची होणारी अडवणूक पाहता श्री. विजय पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले –
“तलाठी कार्यालयाचा डीईसीवरील बारकोडयुक्त सातबारा हा कायदेशीर व मान्य आहे. जर कोणी शेतकऱ्यांना नोंदणीस नाकारत असेल तर ताबडतोब संपर्क साधावा.”
संपर्क : श्री. विजय अनंतकुमार पाटील
पोहरादेवी, ता. मानोरा, जि. वाशीम
मो. ९८८१४४३१८९
No comments:
Post a Comment