मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) : बंजारा समाजाची (Banjara Community) काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे नवीन वर्षानिमित्ताने देशभरातील भाविक भक्त व पर्यटकांची देवी, संताचे दर्शन आणि विकास कामाचा देखावा पाहण्यासाठी मांदियाळी जमत आहे. नूतन १ जानेवारी पासून तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील श्री सेवालाल महाराज मंदिर, श्री संत डॉ रामरावजी बापू समाधी मंदिर आणि जागतिक दर्जाचे ऐतिहासिक वास्तूसंग्रालय नंगारा भवन (बंजारा विरासत) पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक भक्त व पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. यात प्रामुख्याने कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान येथील भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तीर्थक्षेत्र श्री सेवालाल महाराज मंदिर व परकोटचे आणि संत डॉ रामराव बापू महाराज समाधी मंदिर बांधकाम हे राजस्थान शैलीतील उत्कृष्ट नमुना असून भव्यदिव्य बांधकाम आहे. त्यासोबतच तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथील संत श्री जेतालाल महाराज, सामकी माता, तीर्थक्षेत्र पोहरागड विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन शासनाकडून ७२५ कोटी रुपयाचे विकासकामे मार्गी लावली आहेत. ते विकास कामे पूर्णत्वास आली असुन देखावा पाहण्यासाठी भाविक भक्त व पर्यटक गर्दी करीत आहेत.
येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सुलभ दर्शन घेता येईल व शांतता निर्माण करण्यासाठी महंत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर प्रशासन चोख बंदोबस्त ठेवून आहे. या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बांधकाम नागपूर येथील सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी करीत असून यावर कंपनीचे अधिकारी व अभियंता यांचे नियंत्रण आहे. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत नंगारा म्युझियम वास्तूचे उद्घाटन झाले. तेंव्हापासून पोहरादेवी व उमरी खुर्द तीर्थक्षेत्राला जागतिक दर्जाचे स्वरूप आले आहे.
आगामी काळात यावर्षी जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचा जयंतीमहोत्सव दिनी १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री सण येत असल्याने बंजारा बहुजन काशी पोहरादेवी येथे देशभरातील भाविक भक्त हजेरी लावणार असुन येत्या रामनवमी उत्सव पर्यंत विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासन सज्ज झाले आहे.
No comments:
Post a Comment