वाशिम, दि. १४ जानेवारी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) महाराष्ट्र शासनामार्फत सिकलसेल अॅनिमियाविरुद्ध प्रभावी लढा उभारण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘अरुणोदय’ सिकलसेल विशेष अभियान राज्यातील एकवीस जिल्ह्यांमध्ये राबविले जात असून, वाशिम जिल्ह्यात हे अभियान १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
अरुणोदय… सिकलसेलमुक्त भविष्यासाठी… समाजाच्या आरोग्यासाठी विशेष अभियान… या संकल्पनेतून हे अभियान सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सिकलसेल अॅनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून या आजारात लाल रक्तपेशींचा आकार बदलतो व त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. हा आजार संसर्गजन्य नसला तरी गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र वेळीच तपासणी, योग्य निदान व नियमित उपचार केल्यास रुग्ण वेदनामुक्त व सुदृढ जीवन जगू शकतो, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
या विशेष अभियानाअंतर्गत आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सिकलसेल तपासणी, आजाराचे निदान, उपचार, समुपदेशन तसेच व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. तपासणीत सिकलसेल आढळून आल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.
सिकलसेल हा आजार वंशपरंपरागत असल्याने पुढील पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः विवाह जुळवण्यापूर्वी मुला-मुलींची सिकलसेल तपासणी करणे गरजेचे असून रक्तनातेसंबंधातील विवाह टाळावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.
या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी किंवा आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधण्याचेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
No comments:
Post a Comment