वाशिम,दि.२६ जानेवारी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
नागरिक व पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात स्थापन करण्यात आलेल्या ‘संवाद सभागृहाचे’ उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज दि.२६ रोजी अत्यंत उत्साहात करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान , भाप्रसे परीविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड,पोलीस उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपविभागीय अभियंता संचित शिंदे, शासकीय कंत्राटदार सुरेश दहात्रे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारी, समस्या व सूचना थेट पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, संवाद कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक स्वतंत्र व सुलभ व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी संवेदनशीलतेने ऐकून त्यावर वेळेत कार्यवाही करावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिक व पोलीस यांच्यातील परस्पर विश्वास आणि समन्वय अधिक बळकट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनूज तारे यांनी संवाद कार्यालयाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. या कार्यालयाच्या माध्यमातून दररोज ठराविक वेळेत नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येणार असून संबंधित विभागांकडे तात्काळ पाठवून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
संवाद कार्यालयाच्या उद्घाटनामुळे महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, वाहतूक समस्या, सार्वजनिक सुरक्षितता तसेच इतर नागरी प्रश्नांवर त्वरित दखल घेण्याची यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास पोलीस विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment