मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस):
मानोरा तालुक्यातील भूमी उपअधीक्षक (भूमी अभिलेख) कार्यालयाच्या भोंगळ व ढिसाळ कारभारामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील ग्राम चिखली येथील मांगुसिंग राठोड, प्रकाश गोबरा राठोड यांच्यासह चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची अधिकृत मोजणी होऊन पाच ते सहा महिने उलटूनही अद्याप मोजणी शीट देण्यात आलेली नाही तसेच शेताच्या हद्दीही नेमून दिल्या गेलेल्या नाहीत.
मोजणी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार मोजणी शीट व हद्द निश्चितीचे कागदपत्रे वेळेत मिळणे अपेक्षित असताना संबंधित कार्यालयाकडून मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. वारंवार कार्यालयात चकरा मारूनही ठोस व समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कधी “संबंधित कर्मचाऱ्याची बदली झाली आहे”, तर कधी “त्याच कर्मचाऱ्याचे लॉगिन आवश्यक आहे” अशी कारणे सांगून काम लांबवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे खोळंबली असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.
या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना मोजणी शीट व हद्दी त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाकडे करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment