वाशिम ,दि.२९ जानेवारी (जिमाका)स्थानिक ग्रामीण रुग्णालय, मालेगावने आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची मोहोर उमटवत केंद्र सरकारचे 'नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड' हे राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. रुग्णालयाने तब्बल ९३.९९% गुण मिळवून हे मानांकन पटकावले असून, यामुळे वाशिम जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
*तज्ज्ञांकडून सखोल परीक्षण*
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'NHSRC' द्वारे नियुक्त केलेल्या पॅनेलमध्ये डॉ. सागर थंडागोंडा आणि श्रीमती किरण मंथा या तज्ज्ञ परीक्षकांचा समावेश होता. या टीमने १२ आणि १३ जानेवारी २०२६ या कालावधीत रुग्णालयातील विविध विभागांची अत्यंत बारकाईने पाहणी केली. या प्रक्रियेदरम्यान रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास वाहुळे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*विभागांनुसार मिळालेले यश*
परीक्षणामध्ये रुग्णालयातील विविध ९ विभागांचे मूल्यांकन करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने खालील विभागांनी उत्तम कामगिरी केली:*
* जनरल ॲडमिनिस्ट्रेशन: ९६.८%
* आयपीडी (IPD): ९५.१२%
* रेडिओलॉजी: ९४.२%
* अपघात व आपत्कालीन विभाग: ९३.८९%
* ऑपरेशन थिएटर: ९३.३६%
*रुग्ण समाधानावर भर*
रुग्णालयाने केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीतही बाजी मारली आहे. 'मेरा अस्पताल' उपक्रमांतर्गत रुग्णांच्या प्रतिसादावरून दिले जाणारे 'पेशंट सॅटिस्फॅक्शन स्कोअर' (PSS) ८३.५% इतका नोंदवण्यात आला आहे, जो निकषापेक्षा कितीतरी अधिक आहे.
या यशामुळे मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला आता केंद्र सरकारकडून ठराविक कालावधीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, ज्याचा उपयोग आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी केला जाईल. या यशाबद्दल जिल्हा आरोग्य विभाग आणि मालेगाववासियांकडून रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment