दिग्रस —(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या ग्रो-कॅपिटल कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या दोन शिक्षकांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दिग्रस तालुक्यातील ईसापूर येथील केंद्रप्रमुख गिरीश किसनराव दुधे आणि विठाळा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विनोदकुमार किसनराव दुधे यांना बुधवारी (ता. १४) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी तातडीने निलंबित केले.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आर्थिक फसवणुकीत सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सात कोटींहून अधिकचा घोटाळा
“जादा परतावा मिळेल” या आमिषाने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक व कर्मचाऱ्यांनी ग्रो-कॅपिटल कंपनीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. या फसवणुकीचा आकडा सात कोटी रुपयांहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत दिग्रस पोलीस ठाण्यात ४० हून अधिक शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्या असून, यवतमाळ व आर्णी येथेही स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या गंभीर प्रकरणात दिग्रस पोलिसांनी दुधे बंधूंना ६ जानेवारी रोजी अटक केली होती. त्यांना दोन वेळा न्यायालयात हजर करण्यात आले असून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी दारव्हा सत्र न्यायालयाने दोघांची २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करत सीईओंनी दोघांनाही निलंबित करून दारव्हा पंचायत समिती मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
बॉक्स : मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच!
पोलीस तपासात ग्रो-कॅपिटलसह इतर दोन कंपन्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेला मनोज उर्फ विश्वास अशोक पाटील आणि वर्धा येथील पुष्पांजली दिनेश रंधेरिया यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. मात्र अद्याप फरार आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. फसवणुकीचे मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
No comments:
Post a Comment