वाशिम, दि. १२ फेब्रुवारी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
१४ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव २०२६ हा जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारा व पर्यटन विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, त्याच्या नियोजन व अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, किरकोळ उणिवांची पुर्तता करावी असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव २०२६ च्या नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पोहरादेवी येथे कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त डॉ.बाबुराव बिक्कड, पर्यटन विभागाचे उपसंचालक विजय जाधव, महावितरणचे कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. काही यंत्रणा प्रमुखांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, महोत्सवाच्या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सेवा व आपत्कालीन व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये कोणतीही कमतरता राहू नये. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध व जबाबदारीने काम करावे.
महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गर्दी नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे, वाहतूक सुरळीत राहील यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करणे तसेच वाहनतळ व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची उपलब्धता सुनिश्चित करावी, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यक्रमस्थळ व संपर्क रस्त्यांवरील कामे वेळेत तात्काळ पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, पर्यायी मार्ग, वाहनतळ व वाहतूक नियोजन यासंदर्भातील सर्व बाबींचा मास्टर प्लान व मॅप व्दारे सखोल पाहणी करून त्यानुसार अंमलबजावणीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
'भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व सुसह्य वातावरण उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे,' असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
या अनुषंगाने कार्यक्रम स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सूचनाही दिल्या.
नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी वेळेत व प्रभावीपणे होईल यासाठी क्षेत्रस्तरावर काटेकोरपणे दक्षता घेऊन सजग राहण्याची बाबतचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
महोत्सवाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडून भाविकांसाठी सुरक्षित, सुव्यवस्थित व सुसह्य वातावरण निर्माण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यंत्रणांना दिले.
संबंधित नोडल अधिकारी, विश्वस्त व ट्रस्टी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment