Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, February 10, 2026

भागवत कथेचे चौथे पुष्प : समुद्रमंथनातून सत्याचा संदेश

हळदा (ता. मानोरा), दि. ११ फेब्रुवारी २०२६ : ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
तालुक्यातील हळदा येथे संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहात आज चौथ्या दिवसाचे पुष्प ,अनाम कबीर पंथी ह.भ.प. श्रीराम महाराज चिखलीकर यांनी भावपूर्ण रीतीने गुंफले.
चौथ्या दिवशी महाराजांनी समुद्रमंथनाच्या कथेवर सखोल प्रकाश टाकत जीवनातील विकारांचे मंथन करण्याचा संदेश दिला. समुद्रमंथन म्हणजे असत्यातून सत्य शोधण्याची प्रक्रिया असल्याचे सांगताना त्यांनी दुधापासून तूप तयार होण्याचा सुंदर दृष्टांत मांडला. दूध तापवून, त्याचे दही, दह्याचे लोणी आणि लोण्याचे साजूक तूप तयार होते. प्रत्येक टप्प्यावर वस्तू अधिक शुद्ध, अधिक मौल्यवान आणि अधिक टिकाऊ होत जाते. त्याप्रमाणे मनातील काम, क्रोध, मद, मोह, अहंकार आणि वासना यांचे मंथन करून आत्म्याला सत्याच्या मार्गावर नेता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
समुद्रमंथनातून अनेक रत्न बाहेर पडली, मात्र देवांनी कोणत्याही वस्तूचा हव्यास केला नाही. शेवटी अमृताचा कलश प्रकट झाला, जो सत्याचे प्रतीक आहे. चांगल्या विचारांचे आणि संयमाचे मंथन केल्यानेच अमृतरूपी सत्य प्राप्त होते, असा संदेश महाराजांनी दिला. विकार दूर करून सद्गुणांचा स्वीकार केल्यासच जीवनाला सद्गती प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले.
भागवत मंडपात हजारो भाविकांची उपस्थिती होती. विविध दृष्टांत आणि सोप्या भाषेत केलेल्या कथनामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. भक्तिमय वातावरणात चौथ्या दिवसाचा कार्यक्रम उत्साहात आणि समाधानात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर