Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, February 9, 2026

महोत्सव नियोजनात कोणतीही त्रुटी नको - जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर'. श्री. संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव २०२६' नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

वाशिम, दि. ९ फेब्रुवारी (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव २०२६ हा जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेचा व पर्यटन विकासाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याने, त्याच्या नियोजन व अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. 

श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव २०२६ च्या नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा संपन्न झाली. या सभेत महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संभाव्य मोठी उपस्थिती लक्षात घेता, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य व मूलभूत सुविधा याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम करावे, असे त्यांनी नमूद केले.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यक्रमस्थळ व रस्त्यांबाबतची कामे वेळेत पूर्ण करावीत, तर आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके व रुग्णवाहिकांची तसेच प्राथमिक उपचार सुविधांची व्यवस्था सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले. मुलभूत सुविधा,पर्यायी मार्ग, वाहनतळ व्यवस्था, व वाहतूक नियोजनाबाबत  अनुषंगिक सर्व नियोजनाचा मास्टर प्लान व मॅप तयार करून सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध तयारी ठेवावी.

महोत्सवाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडून भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व सुसह्य वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिपादनही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

बैठकीला काही यंत्रणा प्रमुख दुरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर