Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, March 7, 2026

‘शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारात पोहोचविण्यासाठी जिल्हाप्रशासन प्रयत्नरत’– जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला जिल्ह्यात सर्वदूर उत्स्फूर्त प्रारंभ; नागरिकांचा प्रतिसादजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनसिंग व आसेगाव येथे शुभारंभ


वाशिम, दि. ७ मार्च (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)  महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते वाशिम तालुक्यातील अनसिंग व मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव येथे आज दि.(७) रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

 जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील प्रत्येकी एका महसूल मंडळात आज एकूण सहा शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या अभियानाचा एकाच दिवशी शुभारंभ होऊन नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यात आजच्या शुभारंभाच्या दिवशी विविध महसूल प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये फेरफार २१८, ७/१२ दुरुस्ती ११०, डिजिटल सातबारा ९५४, ८-अ उतारे ८४३, विविध प्रमाणपत्रे ८८८, तसेच एकल खिडकी व्यवस्थेंतर्गत ३४३ प्रकरणे मार्गी लावण्यात आली. याशिवाय १५ भूसंपादन प्रकरणांमध्ये कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले, तर ३ अकृषक प्रकरणांना परवानगी देण्यात आली.

नागरिकांनी मोठ्या संख्येने  उपस्थित राहून महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकरणे मांडली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अनेक प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही केली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, रवी काळे तसेच तहसीलदार निलेश पळसकर, सुधाकर अनासुने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने हे अभियान १५ मेपर्यंत जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे बोलतांना म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून प्रलंबित महसूल प्रकरणे निकाली काढणे, नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व उतारे सुलभपणे उपलब्ध करून देणे तसेच प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे हा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात व या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा उद्देश, महसूल विषयक प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन तसेच गावपातळीवर नागरिकांना महसूल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व अर्जांची तात्काळ दखल घेऊन शक्य तितकी प्रकरणे शिबिरातच निकाली काढण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभियानामुळे नागरिकांना विविध कामांसाठी कार्यालयांची पायपीट करण्याची गरज कमी होत असून, एकाच ठिकाणी अनेक सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या महसूल विषयक प्रलंबित समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला महसूलसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

फॉलोअर