यवतमाळ /वाशिम (अफसर शहा ):
यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघातील वाढत्या वाहतूक समस्यांचा विचार करून दिग्रस शहरासाठी बायपास तसेच वाशिम शहरासाठी रिंग रोड उभारण्याबाबत खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
दिग्रस शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे वारंवार ट्रॅफिक जाम, अपघातांचा धोका तसेच प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मानोरा बायपासपासून दारव्हा रोडला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH-161A ते NH-361C दरम्यान बायपास मंजूर करण्याची मागणी खासदार देशमुख यांनी केली.
प्रस्तावित बायपाससाठी ब्रिटिशकालीन रेल्वेची उपलब्ध जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहणाची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प कमी खर्चात व अल्पावधीत पूर्ण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच वाशिम शहरातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून शहराभोवती पूर्ण रिंग रोड विकसित करण्याची मागणी देखील करण्यात आली. सध्या राष्ट्रीय महामार्ग NH-161 (अकोला–हिंगोली मार्ग) वर वाशिमसाठी बायपास असला तरी इतर दिशांमधून येणारी वाहतूक शहरातूनच जात असल्याने शहरात वाहतुकीचा ताण वाढत आहे.
प्रस्तावित रिंग रोड NH-161 (अकोला दिशेकडून) सुरू होऊन NH-161E व राज्य महामार्ग 183 (मंगरूळपीर–पुसद मार्ग) यांना जोडत पुन्हा NH-161 (हिंगोली दिशेकडे) जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा रिंग रोड झाल्यास वाशिम शहराभोवती वाहतूक पूर्णपणे वळवता येणार असून शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांमुळे दिग्रस व वाशिम शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल तसेच अकोला, हिंगोली, पुसद आणि मंगरूळपीर या भागांतील प्रवास अधिक सुरक्षित व जलद होईल, असा विश्वास खासदार देशमुख यांनी व्यक्त केला.
तसेच यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी Central Road Fund (CRF) अंतर्गत प्रस्तावही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. या रस्त्यांना मंजुरी मिळाल्यास ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment