मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) – वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे सहकार, राजकारण व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करणारे ज्येष्ठ नेते सुरेश गावंडे यांचा त्यांच्या पत्नी शोभाताई गावंडे (माजी सभापती, महिला व बाल कल्याण समिती, जि.प. वाशिम) यांच्यासह ग्रामपंचायत कारखेडा व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना बबन देशमुख यांनी केली. त्यांनी सुरेश गावंडे यांच्या सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाचा आढावा घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी दत्तराव डहाके म्हणाले की, “भाऊंचे वय ७३ वर्षे झाले असले तरी त्यांचा उत्साह आजही ३७ वर्षांच्या तरुणासारखा आहे. डहाके परिवार हा त्यांचा कुटुंबच आहे आणि ते आमचे मार्गदर्शक आहेत.”
अरविंद इंगोले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “भाऊ आणि माझी राजकीय सुरुवात जवळपास एकाच काळात झाली. काही काळानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षांत गेलो असलो, तरी आमच्यात मतभेद असू शकतात; मात्र मनभेद कधीच नाहीत.”
सत्कार स्वीकारताना सुरेश गावंडे (भाऊ) यांनी आपल्या मनोगतात राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, १९७२ साली माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या तालमीतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर गजाधार राठोड आणि प्रकाशदादा डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राजकीय व सामाजिक क्षेत्रात घडत गेलो, असे त्यांनी नमूद केले. मात्र आपल्या मनोगतात त्यांनी सुभाष ठाकरे यांचा नामोल्लेख केला नाही, हे उपस्थितांच्या विशेष लक्षात आले. विशेष म्हणजे प्रकाशदादा डहाके यांच्याविषयी बोलताना त्यांचे हृदय दाटून आल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाला दत्तराव गावंडे, उमेश ठाकरे, जयकिशन राठोड, भाऊ नाईक, अशोक चव्हाण, देवेंद्र ताठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध संस्थांच्या वतीने सुरेश गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील वासुदेव सोनवणे यांनी केले, तर देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. ग्रामपंचायत कारखेडा व ग्रामस्थांनी हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केला होता.
यावेळी सुरेश गावंडे यांचे चिरंजीव प्रफुल गावंडे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, सुरेश गावंडे हे चार पिढ्या एकत्र ठेवून संयुक्त कुटुंब चालवणारे कर्ते व्यक्तिमत्व आहे. ते आपल्या गावालाच कुटुंब मानतात. ज्या गावाने ९५ टक्के मतदान एका व्यक्तीला दिले, ते म्हणजे सुरेश गावंडे. समाजकारण, राजकारण आणि कुटुंब व्यवस्थापन या तिन्ही क्षेत्रात त्यांचे कौशल्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment