पोहरादेवी येथे रामनवमीचे औचित्य साधून सांस्कृतिक विभाग व बंजारा विरासत संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम उद्देशाने भव्य आणि प्रेरणादायी असला, तरी प्रत्यक्षात समोर आलेल्या तक्रारींमुळे या उपक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यक्रमासाठी शेकडो साहित्यिक, भजनकरी व कलावंतांनी नाव नोंदविले होते. मात्र, अनेकांना संधी नाकारण्यात आल्याची व ‘पाकीट पद्धती’ने काही निवडकांना नगदी देण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. परिणामी, अनेक कलावंत लाभापासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, काही ठिकाणी कलाकारांसाठी किमान जेवण व पाण्याची व्यवस्थाही नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. कला आणि कलाकारांचा सन्मान राखणे ही आयोजकांची मूलभूत जबाबदारी असताना अशा त्रुटी अक्षम्य ठरतात.
या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत असून, विशेषतः ना. संजय राठोड यांनी या बाबीकडे लक्ष देऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तथापि, यासंदर्भात पत्रकारांनी यवतमाळ येथील संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे देण्याचे टाळल्याचे समोर आले. ही बाब अधिकच संशय निर्माण करणारी ठरत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम हे समाजाच्या एकतेचे आणि परंपरेच्या जतनाचे माध्यम असतात. मात्र, त्यात जर पारदर्शकतेचा अभाव, पक्षपातीपणा आणि व्यवस्थापनातील निष्काळजीपणा दिसून आला, तर अशा उपक्रमांची विश्वासार्हता धोक्यात येते. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करणे आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालणे, हीच काळाची गरज आहे.
No comments:
Post a Comment