शेंदुरजना (अ) / वाशिम :-( अफसर शहा)
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती काही दिवसांच्या बंदीनंतर आज, ३० मार्चपासून, पुन्हा सुरू झाली आहे. बाजार उघडताच शेतकर्यांनी सोयाबीन आणि इतर पिकांचा मोठ्या प्रमाणावर माल विक्रीसाठी आणला. बाजार समितीचा हा उघडण्याचा निर्णय शेतकर्यांसाठी आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.
सध्या सोयाबीन आणि गव्हाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकर्यांमध्ये काही प्रमाणात असंतोष जाणवत आहे. तरीही, बाजार समितीच्या सुरू होण्यामुळे शेतकर्यांना आपला माल अधिक सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने विक्रीसाठी आणण्याची संधी मिळाली आहे.
शेतकर्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत महत्त्वाच्या विषयात वेळेवर कारवाई का झाली नाही, असा सवाल केला आहे. शेतकरी संघटना ठामपणे मागणी करत आहेत की प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावी, जेणेकरून शेतकर्यांचा विश्वास, आर्थिक सुरक्षा आणि पिकांचा योग्य भाव राखला जाईल.
बॉक्स
*प्रशासनाच्या निर्णयानंतर बाजार समिती सुरु*
वाशिम बाजार समिती १५ दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावर प्रशासनाने कडक भूमिका घेत व्यापारी व आडते असोसिएशनला नोटीस बजावली होती. प्रशासनाने ३० मार्चपासून खरेदी-विक्री तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले, नियम मोडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. बाजार बंदीमुळे शेतकर्यांना झालेले नुकसान थोड्याशा प्रमाणात टळले असले तरी काही शेतकर्यांनी ‘बाजार बंद राहिल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बॉक्स
*कारंजा बाजार समिती नाणे टंचाईमुळे ३० मार्च ते ४ एप्रिल बंद*
नाणे टंचाईमुळे कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ३० मार्च ते ४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कारंजा तालुक्यातील शेतकर्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बाजार बंद राहिल्यास खासगी व्यापारी कमी दरात शेतमाल खरेदी करून शेतकर्यांना आर्थिक नुकसान करीत आहेत. स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनास योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली आहे, नाहीतर शेतकर्यांचा कोट्यवधींचा नुकसानीचा धोका वाढेल.
No comments:
Post a Comment