Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, March 29, 2026

भागवत कथेचे तिसरे पुष्प : “दृष्टी शुद्ध असेल तरच जीवन शुद्ध” – श्रीराम महाराज चिखलीकर


मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
मानोरा तालुक्यातील धानोरा येथील महादेव संस्थानमध्ये सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहात तिसऱ्या दिवशी भावपूर्ण व बोधप्रद कथाकथन करण्यात आले. अनाम कबीर पंथी ह.भ.प. श्रीराम महाराज चिखलीकर यांनी श्रीमद् भागवत कथेतील अजामील ब्राह्मणाची कथा प्रभावीपणे मांडत मानवी जीवनात ‘दृष्टी’चे महत्त्व अधोरेखित केले.
महाराजांनी सांगितले की, मनुष्य जे पाहतो त्यावरूनच त्याचे विचार व आचरण घडत असते. पाहण्याची दृष्टी शुद्ध नसल्यास डोळ्यांद्वारे पाप शरीरात प्रवेश करते आणि माणूस अधःपतनाकडे वाटचाल करतो.
या संदर्भात त्यांनी एक दृष्टांत सांगितला. एक संन्याशी कठोर तपश्चर्या करीत असताना त्याची तपश्चर्या पूर्ण होईल या भीतीने इंद्र चिंताग्रस्त झाला. त्याने पारध्याचे रूप धारण करून त्या संन्याशाची तपश्चर्या भंग करण्याचा डाव रचला. पारध्याने आपले धनुष्य संन्याशासमोर ठेवून ते घेण्यासाठी परत येतो असे सांगून निघून गेला; मात्र तो परतलाच नाही. समोर असलेल्या धनुष्याकडे संन्याशाची दृष्टी वारंवार जाऊ लागली. कालांतराने त्या धनुष्याविषयी मोह निर्माण झाला आणि अखेरीस त्याने ते उचलून निशाणा साधण्यास सुरुवात केली. पुढे तो पक्ष्यांची शिकार करू लागला आणि अशा प्रकारे त्याची तपश्चर्या भंग पावली.
याच अनुषंगाने महाराजांनी अजामील ब्राह्मणाची कथा उलगडली. वेदशास्त्रांचा अभ्यास करणारा, कथा-कीर्तन करणारा अजामील एका स्त्रीच्या संगतीत पडला. एका चुकीच्या दृष्टीमुळे आणि वासनांच्या मोहामुळे त्याचा विवेक हरपला व त्याचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.
“तपश्चर्या करणारा माणूसही चुकीचे दृश्य पाहिल्यानंतर मोहात पडू शकतो. त्यामुळे दृष्टी संयमित ठेवणे हेच खरे साधन आहे,” असा मोलाचा संदेश महाराजांनी तिसऱ्या पुष्पातून दिला.
या दिवशीचे कथाकथन भाविकांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारे ठरले. कार्यक्रमास ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर