वाशिम, दि. २३ मार्च (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क ):
पुस्तक वाचनातून समाजाला आणि विशेषतः विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. वैचारिक जडणघडण घडविण्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक असून, व्यक्ती कोणतीही असो वाचनामुळे विचारांचे आदानप्रदान सुलभ होते. गावपातळीवरील ग्रंथालयांनी पुस्तकांची सुयोग्य वर्गवारी करणे गरजेचे असून त्यामुळे वाचकांना अपेक्षित पुस्तके तत्काळ उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी बालवाचन कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत ग्रंथोत्सव २०२५ चे आयोजन दि. २३ मार्च २०२६ रोजी उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी श्री कुंभेजकर बोलत होते.
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक धोंडुजा इंगोले आणि प्रज्ञाताई शिरसागर यांच्या हस्ते सकाळी हिरवा झेंडा दाखवून दिंडीची सुरुवात करण्यात आली. या दिंडीत राणी लक्ष्मीबाई शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी एनसीसी गणवेशात उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी प्रा. भाऊसाहेब काळे, प्रभाकरराव घुगे, विलास अंभोरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जगात कोणतीही व्यक्ती वाचनाशिवाय मोठी झालेली नाही. सर्व क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या घडणीत वाचनाचा मोलाचा वाटा आहे, असे त्यांनी नमूद केले.
पुढे भालेराव पुढे म्हणाले की, ग्रंथ हे केवळ माहितीचे साधन नसून ते माणसाला विचारशील, संवेदनशील आणि संस्कारित बनविण्याचे माध्यम आहे. समाजात वाचन संस्कृती वाढावी, विशेषतः तरुण पिढीने पुस्तकांशी मैत्री करावी, यासाठी ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी कारंजा उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, विभागीय ग्रंथालय अध्यक्ष प्रभाकरराव घुगे, ज्येष्ठ साहित्यिक धोंडुजा इंगोले, बाबुराव मुसळे, नगराध्यक्ष अनिल केंदळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे तसेच ग्रंथमित्र धनंजय राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते ग्रंथालयात उभारलेल्या पुस्तक स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी केले. ते म्हणाले, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि समाजामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे हा या ग्रंथोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. बदलत्या काळात डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढत असले तरी पुस्तक वाचनाचे स्थान आजही तितकेच महत्त्वपूर्ण आहे.
जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण व्हावी, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमतेची जडणघडण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचक, लेखक आणि ग्रंथालय यांच्यात सुसंवाद साधला जावा, ही अपेक्षा आहे.
या ग्रंथोत्सवात आयोजित विविध उपक्रमांमधून वाचनाची गोडी अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रभाकरराव घुगे व सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संचालन अनिल बळी यांनी केले. समन्वय समितीचे सदस्य गजाननराव वाघ यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment